आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात!
नाशिक : अश्विनी पांडे
भारतीय संस्कृतीत मातृ -पितृ देवो भव अर्थात माता पिता हे देवासमान मानण्यात येतात.पण याच देवांना आधाराची गरज असताना आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात व्यतित करण्याची वेळ आली आहे. हम दो हमारा एकच्या जमान्यात आणि सासू-सुनेचे पटत नसल्यामुळे अथवा मुलगा परदेशात स्थिरावल्याने अनेकजण वृद्ध माता पित्यांची सोय वृद्धाश्रमात करत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
मुलांना आई वडिलांची उतार वयातील काठी समजण्यात येते. पालकांनाही आयुष्याच्या शेवटच्या काळात मुले सांभाळतील अशी अपेक्षा असते. मात्र, काळानुरूप आर्थिक आणि सामाजिक स्तर सुधारला असता तरी वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करणे जड जात आहे. विशेषत्वाने उच्चभ्रू समजल्या जाणार्या वर्गाकडून आई वडिलांना वृद्धाश्रमात धाडले जात आहे. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून मुले आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असल्याचे चित्र आहे. परिणामी गेल्या काही वर्षात शहर आणि गावाबाहेर निसर्गाच्या सानिध्यात वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहेत. महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये त्यासाठी मोजले जात आहेत.
तुलनेत सर्वसामान्य कुटुंबात मात्र आजही माता पित्यांना आदराचे स्थान आहे. वाढत्या वयोमानानुसार वृद्धांना मानसिक व शारिरीक आधाराची गरज असते. मुले , मुली नातवंडे यांच्या सोबत आयुष्याची संध्याकाळ घालवण्याची इच्छा असलेल्या वृद्धांकडून जीवनाच्या शेवटच्या क्षणातील आनंदाचे क्षण हिरावण्यात येत आहे.
वृद्धाश्रमात पाठवण्याची कारणे
1. आई वडिलांचे आजारपण करण्यास वेळ नसणे
2. आई वडिलांची घरात अडचण होणे.
3. वृद्धापकाळानुसार त्यांच्यात होत असलेल्या बदलांना स्वीकारत सांभाळ करणे जिकिरीचे वाटणे.
4. पती पत्नी दोघेही नोकरी असल्याने वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास अडचण
5. मुलगा परदेशात स्थिरावल्याने लक्ष देण्यास वेळ नाही
6. सासू-सुनांमधील नित्याची कटकट
7. आजी आणि नातवांचे दररोज उडणारे खटके
संवेदना झाल्या बोथट
आई वडिल यांच्या प्रती असलेल्या संवेदना बोथट झाल्याने पालक घरातील अडगळ वाटतात.त्यामुळे आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यात येत आहे.
वृद्धाश्रमात सोडल्यानंतर मुले फिरकत नाहीत
मुलांनी एकदा आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून गेल्यानंतर आई वडिलांची विचारणा करायलाही मुले परत येत नाहीत, सणावाराला तरी घरचे खाण्यास मिळावे अशी अपेक्षा असते. अशा व्यथा वृद्धाश्रमातील अनेकांनी व्यक्त केल्या.
कोरोनानंतर वृद्धाश्रमात येणार्यांची संख्या वाढली आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांकडून वृद्धाश्रमाबाबत चौकशी करण्यात येते . पण यात उच्चभ्रू वर्गातील जास्त लोक येत असतात. तर यात पुरूषांची संख्या जास्त असून वृद्धाश्रमात 5000 ते 6000 रूपये प्रत्येकी आकारण्यात येतात.
– प्रशांत पाटील, (संजीवनी आनंदालय वृद्धाश्रम)