नाशिक : प्रतिनिधी
12 व 24 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड अशा दोन वेतनश्रेणी दिल्या जातात. त्यासाठी शिक्षकाला प्रशिक्षण बंधनकारक असते. मात्र, या प्रशिक्षणाचा पूर्ण फज्जा उडाला असून, हे प्रशिक्षण ऑनलाइन न घेता ऑफलाइन घेण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रशिक्षणात अनेक अडचणी असून, त्यात प्रशिक्षणार्थींचे पासवर्ड लॉगीन न होणे, इंटरर्नल सर्व्हर एरर असेच मेसेज सर्वांना येत असल्याने शिक्षक प्रचंड संतप्त झाले आहेत.
काही दिवसांत शाळा सुरू होतील. शाळेचे काम शिक्षकांना करायचे आहे. त्यात पावसाळा सुरू होणार आहे. नेट प्रॉब्लेम, ऑनलाइन प्रशिक्षण कसे पूर्ण होणार! मेमध्ये सुटी असताना शालेय शिक्षण विभागाने आता शाळा सुरू होण्याच्या तोंडावर हे प्रशिक्षण कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. सुटीत ऑनलाइन प्रशिक्षण का ठेवले नाही? शालेय शिक्षण विभागाचे हे ऑनलाइन काम संशयास्पद आहे. त्यापेक्षा ऑफलाइन प्रशिक्षण घ्यावे यासाठी सर्व शिक्षक संघटना व प्रशिक्षणार्थी यांनी मागणी केली आहे. त्यासाठी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे, ऑनलाइन प्रशिक्षण रद्द करा व ऑफलाइन प्रशिक्षण घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन घेण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे राज्य समन्वयक के. के. अहिरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे आदींनी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.
डिसेंबर 21 ला वरिष्ठ व निवडश्रेणी पात्र शिक्षकांची नोंदणी झाली. प्रत्येकी 2000 रुपये ऑनलाइन शुल्क भरले आहे. राज्यभरातून 95,411 शिक्षकांनी नोंदणी केली. 1 जून 22 पासून प्रशिक्षण सुरू होणार, असा गाजावाजा केला. 1 जूनला 11वाजता ीलशीीं ारहर.लेा या लिंकवर जाऊन प्रशिक्षण सुरू झाले. त्यात साधारण 5000 लोक जॉइन केले. नंतर खासगी मेलवर तुरळक प्रमाणात काही शिक्षकांना लॉगीन करता आले. अजून बरेच वंचित आहेत. प्रशिक्षण कालावधी 30 जून 22 पर्यंत फक्त 60 तास दिले. ही एक मर्यादा घालून दिली. झूम मीटिंग 100 लोकांसाठीच मर्यादित होती. परिणामी, अनेक लोक वंचित राहिले म्हणून ऑनलाइन प्रशिक्षण रद्द करून ऑफलाइन प्रशिक्षण मिळावे, अशी प्रशिक्षणार्थींची मागणी आहे.
प्रशिक्षणादरम्यान अनंत समस्यांनी शिक्षक हैराण
पुणे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण देण्यास अपयशी ठरली असून, महाराष्ट्रात 94 हजार शिक्षकांनी, प्रत्येकी दोन हजार रु. याप्रमाणे कोट्यवधी रुपये जमा करूनही मोठ्या प्रमाणात अनंत समस्या येत आहेत. या समस्यांमुळे अनेक शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहून चिंताग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे शासनावर अशी शंका निर्माण होत आहे की, प्रशिक्षणादरम्यान अनंत समस्या निर्माण करून शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर शासनाचा नाही ना, अशी शंका शिक्षकांनी उपस्थित केली आहे.