मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभरात हे अभियान राबविले जाणार असून, हे अभियान पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाला राज्यभरात महिलांकडून वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी मध्य प्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा राष्ट्रीयस्तरावर शुभारंभ केला. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून ऑनलाइन प्रणालीद्वारे सहभाग घेतला. त्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार मनीषा कायंदे, केंद्रीय सहसचिव ज्योती यादव, प्रीती चौधरी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्यसेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यावेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरावरील स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या अभियान शुभारंभ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी रक्तदान प्रतिज्ञा घेण्यात आली, तसेच क्षयरोग निर्मूलनासाठी काम करण्यार्या स्वयंसेवी संस्था तसेच निक्षय मित्र यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्मान कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना कार्ड यांचेही यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
अभियानाच्या शुभारंभानिमित्त राज्यभरात प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी 75 आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दि. 17 सप्टेंबर रोजी अभियानाच्या पहिल्या दिवशी 75 आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.आभार आरोग्यसेवा संचालक
डॉ. विजय कंदेवाड यांनी मानले.