सिडकोच्या स्टेट बँक चौकात झिंगलेल्या तरुणींचा राडा, अश्लील शिवीगाळचा व्हीडिओ व्हायरल

सिडको विशेष प्रतिनिधी :

सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात दोन अल्पवयीन मुलींनी एका युवकास मद्यधुंद अवस्थेत मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यापूर्वी गंगापूर रोड तसेच इंदिरानगर येथील बोगद्याजवळ एक तरुणी मध्यधुंद अवस्थेत राडा करताना आढळली होती. नाशिक ही धार्मिक नगरी आहे. अशा प्रकारच्या घटनांनी नाशिकची प्रतिमा मलिन होत आहे, सिडको भागातील या राडा करणाऱ्या तरुणींना अटक करण्याची मागणी होत आहे.

अंबड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर आवारे (वय १९) हे १९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौकात थांबले असता, दुचाकीवरून आलेल्या दोन अल्पवयीन तरुणींनी त्यांना अडवून विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी आवारे यांना हाताने मारहाण करत रस्त्यावरच गोंधळ घातला. हा प्रकार जवळपास १५ ते २० मिनिटे सुरू होता. या संपूर्ण कालावधीत पोलिसांची कुठलीही उपस्थिती दिसून आली नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित युवकाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सिडको परिसरात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अनुशासनभंग करणाऱ्या घटना घडत असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवावी आणि अशा प्रकारांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *