हेमंत ऋतू आणि आयुर्वेद

गुलाबी थंडीची चाहूल लागली की, निसर्गासोबतच मानवी शरीरातही अनेक बदल घडू लागतात. आयुर्वेदाने वर्षाची सहा ऋतूंमध्ये विभागणी केली असून, त्यातील हेमंत ऋतू (साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी) हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आयुर्वेदानुसार हेमंत ऋतू हा विसर्ग काळाचा भाग असल्याने या काळात निसर्ग स्वतःच शरीराला बळ देतो. त्यामुळेच वर्षभरासाठी लागणारी रोगप्रतिकारकशक्ती आणि शारीरिक ताकद कमावण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे.

थंडीत भूक का वाढते?
हिवाळ्यात बाहेरील वातावरण थंड असते. या थंडीमुळे शरीरातील उष्णता बाहेर न पडता शरीराच्या आतच कोंडली जाते. परिणामी पोटातील जठराग्नी (पचनशक्ती) अत्यंत प्रदीप्त आणि बलवान होतो. यामुळेच हिवाळ्यात कडाडून भूक लागते आणि पचायला जड असलेले पदार्थही सहज पचतात. जर या काळात शरीराला पुरेसा आणि पौष्टिक आहार मिळाला नाही, तर हा प्रदीप्त अग्नी शरीरातीलच धातूंचे (रस, रक्त, मांस इ.) शोषण करू लागतो, ज्यामुळे थकवा किंवा वातविकार उद्भवू शकतात.
या काळात शरीरातील वाढलेल्या अग्नीला शांत करण्यासाठी आणि शरीराचे पोषण करण्यासाठी गोड (मधुर), आंबट (आम्ल) आणि खारट (लवण) चवीचे, तसेच स्निग्ध आणि उष्ण पदार्थ खाणे आवश्यक आहे.
पौष्टिक लाडू : डिंक, मेथी, अळीव, खारीक, खोबरे आणि सुकामेवा घालून केलेले लाडू या ऋतूत अमृतासमान काम करतात.
स्निग्ध पदार्थ : आहारात गाईचे शुद्ध तूप, लोणी, दूध आणि तिळाचा मुबलक वापर करावा.
धान्य आणि भाज्या : बाजरीची भाकरी, नवीन तांदूळ, उडीद, गहू तसेच हिवाळ्यात येणार्‍या ताज्या पालेभाज्या, गाजर, आवळा आणि मुळा यांचा आहारात समावेश असावा.
रसायन सेवन: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी च्यवनप्राश किंवा आवळ्याचा मुरंबा घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.
केवळ चांगला आहार पुरेसा नाही, तर त्याला योग्य दिनचर्येची जोड देणेही तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि वात वाढतो. त्यामुळे रोज सकाळी कोमट तीळ तेलाने संपूर्ण शरीराला अभ्यंग करावे. विशेषतः डोके, कान आणि तळपायांना तेल लावणे खूप लाभदायक ठरते.
या ऋतूत शरीराची ताकद उत्तम असल्याने अर्धशक्तीने (घाम येऊन दम लागेपर्यंत) नियमित व्यायाम, योगासने आणि सूर्यनमस्कार करावेत.
आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. थंड वार्‍यापासून बचावासाठी लोकरीचे किंवा उबदार कपडे परिधान करावेत.
सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान 15 ते 20 मिनिटे बसावे, यामुळे शरीराला नैसर्गिक मडफ जीवनसत्त्व आणि ऊब मिळते.
या काळात शरीरातील अग्नी प्रखर असल्याने कडक उपवास करणे किंवा खूप कमी खाणे टाळावे. थंड, शिळे, कोरडे (रुक्ष) पदार्थ, आईस्क्रीम, शीतपेये यांचे सेवन करू नये. तसेच दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे टाळावे. कारण यामुळे कफ आणि वात दोष बिघडण्याची शक्यता असते.
हेमंत ऋतू ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक आरोग्यदायी संधी आहे.
आयुर्वेदाने सांगितलेली ही साधी, सोपी हेमंत ऋतुचर्या जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणली, तर केवळ हिवाळाच नाही, तर येणारे संपूर्ण वर्ष आपण निरोगी, उत्साही आणि आजारांपासून दूर राहू
शकतो.

The Hemanta Season (Early Winter) and Ayurveda

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *