वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. 13) अखेरचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्वच प्रभागांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी शेवटचा दिवस प्रभावी ठरावा यासाठी जोरदार तयारी केली होती. गेल्या दहा दिवसांपासून गल्लीबोळ, वसाहती आणि घरोघरी फिरून मतदारांशी थेट संपर्क साधणार्या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी प्रचाररॅली, पदयात्रा आणि बाइक रॅली काढत प्रचाराचा जोर वाढवला.
सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचे ताफे रस्त्यावर उतरले होते. पक्षाचे झेंडे, घोषणाफलक, ढोल-ताशे आणि जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. मतदान करा, विकासाला साथ द्या, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्या, अशा घोषणा देत मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी चौकसभा घेऊन उमेदवारांनी आपल्या आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेतला. आगामी काळातील विकासकामांची आश्वासने दिली.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात शहरात राज्यस्तरीय व बड्या नेत्यांच्या सभांमुळे प्रचाराला विशेष रंग चढला होता. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी मर्यादित कालावधी मिळाल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. मात्र, उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी काटेकोर नियोजन केले होते. सोशल मीडियाचा वापर, फोन कॉल्स, पत्रकवाटप, वाहनांवरून प्रचार यांसह प्रत्यक्ष भेटींवर विशेष भर देण्यात आला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांकडे थेट मतदानाची विनंती केली. महिलांचे, युवकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र गट तयार करून संवाद साधण्यात आला. आता शहराचे लक्ष गुरुवारच्या (दि. 15) मतदानाकडे लागले आहे.
The last day was filled with campaign rallies.