घटस्थापनेच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी
नाशिक : प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होण्यास अवघे एक दिवस उरला आहे. रविवार (दि. 11)पासून घरोघरी घटस्थापनेने उत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा सजल्या असून, घट, देवीचे मुखवटे, वस्त्रे, दागिने आणि पूजेसाठी लागणार्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. शहराने उपनगरातील रस्त्यालगत हंगामी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. बाजारपेठेत नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
शहरातील रविवार कारंजा, शालिमार, मेनरोड, पंचवटी तसेच नाशिकरोड, सिडको, सातपूर, इंदिरानगर, लेखानगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक शहर व उपनगरातील मुख्य बाजारपेठेत विविध पूजा साहित्य दाखल झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. बाजारात पारंपरिक मातीच्या घटांसह विविध रंगांच्या आकर्षक घटांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. नक्षीकाम, कलाकुसर, आरशांचे तुकडे, मणी आणि रंगीत कागदांनी सजवलेले घट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही घटांवर देवीची प्रतिमा, स्वस्तिक, ओम, कमळ आणि कलश यांसारखी धार्मिक चिन्हे रेखाटण्यात आली आहेत. देवीचे रूप दिलेले घट तसेच लहान आकारातील घटही बाजारात दाखल झाले आहेत.
घटस्थापनेसाठी लागणारी माती, सप्तधान्य, नारळ, फुले, हार, पाने, परडी, वस्त्रे, हळद-कुंकू आणि अन्य पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. देवीचे मुखवटे, विविध दागिने, पंचखाद्य तसेच अखंड दिव्यासाठी लागणार्या वाती आणि तेलाचीही विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत येत आहेत.
प्रत्येक कुटुंबात कुलधर्म आणि कुलाचारानुसार नवरात्रोत्सव साजरा केला जातो. काही घरांमध्ये मातीचे घट बसवून नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो, तर काही कुटुंबांमध्ये परंपरेनुसार घटस्थापनेच्या दिवशी आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी उपवास केला जातो. नवरात्रोत्सवाच्या काळात घराघरांत पूजाअर्चा आणि विविध धार्मिक विधींची तयारी सुरू झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना आणि जागर केला जातो. या काळात भाविक विविध देवींच्या मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतात. घटस्थापनेला धार्मिक महत्त्व असल्याने पूजेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे.

मातीचा घट : 20 ते 100 रुपये
सप्तधान्य : 10 रुपये
देवीचे मुखवटे : 50 ते 500 रुपये
देवीचे वस्त्र : 20 ते 100 रुपये
ओटीचे साहित्य : 20 ते 100 रुपये
होमपुडा : 20 ते 50 रुपये
अखंड दिव्याची वात : 10 ते 20 रुपये
घटस्थापनेसाठी माती : 10 रुपये
परडी : 40 ते 60 रुपये
नागलीची पाने : 20 रुपये
पाच फळे : 50 रुपये
पंचखाद्य : 50 ते 100 रुपये
नारळ : 40 ते 60 रुपये
The market is decked up for the Navratri festival.