ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:।
नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥
ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव प्रमुख आहे त्यास नमस्कार. या सर्प सूक्तमध्ये नागस्तोत्र नागराजाचे मनोभावे वंदन केलेले आहे. सर्पांत विशेष नागाला अत्यंत धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या नागदेवतेची पूजा सर्वत्र केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात नागपंचमी सणाला नागाची पूजा केली जाते. शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया, ऐरावत, धृतराष्ट्र आणि शंखपाल यांसारख्या नागांची पूजा केली जाते. या दिवशी सापांना लाह्या वाहिल्या जातात, दूध पाजले जाते व त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे कुटुंबाला संरक्षण मिळते, असे मानले जाते. नागपंचमी सण त्यानिमित्त सर्प विज्ञानाची गरज जाणून घेऊया.
आपल्या शेतीत उंदीर, घुशींमुळे पिकांची नासाडी होत असे. अशी नासाडी सापांचे भक्षक असल्याने शेती व्यवस्थित होण्यासाठी नैसर्गिकरीत्या नियंत्रणाचे काम साप करत असतात. म्हणून ते एकप्रकारे शेतकर्यांचे मित्र आहे. म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून पूजा केली जाते. भगवान महादेवाच्या गळ्यातील हार, तर भगवान विष्णू यांची शय्या म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात अनेक ठिकाणी नागदेवतेची मंदिरे आहेत. अनेक धर्मांत नागदेवतेला महत्त्व दिलेले आहे. संत तुकाराम महाराज सांगतात, कोणत्याही प्राण्याचा मत्सर न करता चित्त शुद्ध करावे. सुखी करणे ही ईश्वराची पूजा आहे. ते पुढील अभांगातून सांगतात…
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी।
होतील ते कष्टी व्यापकपणें॥
साप त्याच्या प्रजाती, विषारी, निमविषारी, बिनविषारी साप, त्यांचे अधिवास, प्रजनन काळ, दक्षता व उपचार यासंबंधी माहिती असणे अवश्य आहे. पूर्वी शेती बारमाही नसल्याने अनेक साप हे अडगळीत, झाडेझुडपे, डोंगर, माळरानावर असत. कारण त्यांना तिथे त्यांचे भक्ष्य सहज मिळत असे. आज बारमाही शेती, नगदी पिके व धरणांच्या पाटावाटे येणारे पाणी यामुळे सतत ओलावा मिळाल्याने त्यांना मोठे आश्रयस्थान प्राप्त झाले आहे. अशा कारणाने सर्पदंश वाढू लागले आहेत. पावसाळी हंगाम हा त्यांचा प्रजनन काळ असतो. त्यासाठी शासनाने जनजागृती केली पाहिजे.
साप म्हटले की, प्रथम जाणवते ती भीती. ही भीती नाहीशी करायची असेल तर विषारी, निमविषारी, बिनविषारी साप ओळखता आले पाहिजेत. बर्याचदा अज्ञानातूनच साप मारले जातात. निसर्गातील इतर घटकांप्रमाणे साप परिसंस्थेचे भाग आहे. त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ नये, यासाठी त्यांच्याविषयीचे सर्प विज्ञान जाणून घेतले पाहिजे. जगात जवळपास 2,700 प्रकारचे साप, तर भारतात 340 जाती सापडतात. त्यात 69 जाती विषारी आहेत. महाराष्ट्रात 52 जातींत जवळपास 12 साप विषारी आहेत. विषारी साप नाग, मण्यार, घोणस, फुरसे, पोवळा, चापडा, समुद्र साप, निमविषारी साप मांजर्या, हरणटोळ, उडता सोनसर्प, भारतीय अंडीखाऊ साप, श्वानमुखी, झिलान,जाडरेती सर्प, तर बिनविषारी धामण, धूळनागीण, मांडूळ, अजगर, तस्कर, खवल्या, गवत्या, पानदिवड, कवड्या, नानेटी, डुरक्या घोणस, विंचू वाळा, चिगांग नायकुळ, कुकरी, कृष्णशीर्ष, शेवाळी वनसर्प, रजतबन्सी होत. नाकोंडा जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. हा साप दक्षिण अमेरिकेत आढळतो, तो बिनविषारी व निशाचर आहे. तो पाण्यात राहतो. जवळपास 250 किलो, तर 30 फुटांपर्यंत लांबीचा असतो. तो भारतात आढळत नाही. हे सर्व साप उंदरांची बिळे, वीट-दगडाचे ढीग, अडगळीच्या जागा, काही साप खारफुटीची जागा, खेकड्यांची बिळे, काही साप झाडावर, गवतात आढळतात. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक, पक्ष्यांची अंडी, छोटे कीटक, तर समुद्री साप मासे खातात. अजगरासारखे साप ससे, हरणाची पिल्ले, डुक्कर, घुशी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या त्याचे भक्ष्य असते. जागतिक आरोग्य संघटनेने सन 2023 मध्ये भारतातील सर्पदंश मृत्यू आकडेवारी जवळपास 50 हजार मृत्यू आहे, असे जाहीर केले आहे.
नागराज (किंग कोब्रा) हा विषारी साप 14 ते 15 फुटांपर्यंत आढळतो. सापाची मादी अंडी देते. 3 ते 4 फुटांपर्यंत फणा काढतो. घनदाट अरण्यात वस्तीला, तर खाद्य म्हणून लहान विषारी, बिनविषारी सापांनासुद्धा खातो. तो महाराष्ट्रात आढळत नाही. त्याच्या सात जाती भारतात आहेत.
नाग हा विषारी जातीचा साप 10 सारखा मागे आकडा असतो. 6 ते 7 फूट लांबीचा देखणा दिसणारा साप. त्याची मादी अंडी देते. मण्यार हा विषारी साप. उंदीर, सरडे, पाली खातो. निशाचर असल्याने रात्री दिसतो. अंगावर निळसर काळ्या रंगाचे आडवे पट्टे, तर डोक्यावर पांढरे ठिपके असतात. पाच फुटांपर्यंत लांब असतो. याच्या भारतात आठ जाती सापडतात. विषारी घोणसचे गर्द पिवळ्या तपकिरी रंग, लांबट गोल शरीर असते. या ठिपक्यांच्या शरीराच्या डावीकडे उजवीकडे डोक्यापासून शेपटीपर्यंत तीन माळा असतात. या सापाची मादी पिल्लांना जन्म देते. भारतात याच्या दोन जाती सापडतात. चिडल्यावर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो. विषारी फुरसे साप तपकिरी लाल रंगावर पांढरी नक्षीदार, डोक्यावर बाणाकृती पांढरी नक्षी असते. शरीरावर करवतीच्या दातासारखे खवल्या असतात. विंचू हे त्याचे भक्ष्य आहे. याच्या तीन जाती भारतात सापडतात. लांबी सव्वादोन फुटांपर्यंत असते. तो घोणसप्रमाणे जाडजूड
असतो.
नाग, मण्यारचे विष न्यूरोटॉक्झिक असल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो. दंश झालेल्या ठिकाणी जळजळ, तीव्र वेदना, अंग जड होणे, हातपाय गाळून जाणे, डोळ्याच्या पापण्या आपोआप मिटणे, झोप आल्यासारखे होणे, मळमळ, उलट्या, जीभ जड, पोट, सांधे दुखू लागणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. घोणस व फुरसे यांचे विष हिमोटॉक्झिक असल्याने रक्तावर परिणाम होतो. दंशाच्या ठिकाणी सूज येते व वाढत जाते. जखम होत लालसर हिरवट पाणी येते. हिरड्या नाक, कान, लघवीतून रक्त यायला लागते. कोणताही सापाचा दंश झाल्यास बाधित व्यक्तीचे मनोबल खचू न देता धीर देणे, रक्ताभिसरण वेगाने होऊ नये यासाठी त्यास जास्त चालू, बोलू देऊ नये. नाग, मण्यार दंश असल्यास आवळपट्टी रक्तपुरवठा बंद होईल अशी बांधू नये. जखम पाण्याने धुऊन जंतुनाशकाने स्वच्छ करावी. खाण्यापिण्यास देऊ नये. दंश झालेल्या ठिकाणी कापू नये. अति तातडीने रुग्णास दवाखान्यात न्यावे.
काही काळजी दक्षता घेणे गरजेचे आहे. जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी अशा ठिकाणी साप येतात. त्यासाठी अंगण व घराची स्वच्छता असावी. अडगळ ठेवू नये. रात्री फिरणे, काठी आपटत चालावे, काठच्या कंपनाने साप बाजूला सरकतात. भ्रमंती करताना टोपी, पायात बूट घालावेत. घराजवळ अंडी देणारे पशु-पक्षी ठेवू नये. शेतात पीक शिंपणी करताना, काढताना गमबूट वापरावेत. शेतातील घरात झोपताना भिंतीला खेटून झोपू नये. घराबाहेरचा दिवा दरवाजापासून दूर असल्यास कीटक खाण्यास साप येत नाही. रानातील घरात मांजर असावी. साप दिसल्यास विनाकारण डिवचू नये. माहिती असल्याशिवाय पकडू नये. मारू नये. सर्पमित्रांना तातडीने माहिती द्यावे. ते योग्यरीतीने पकडून जंगलात सोडतील.
सापांबाबत काही अंधश्रद्धा व भाकड कथा रूढवात आहेत. सापाला तीन फुटांपेक्षा पुढील अंधुक दिसते. त्यास कृष्णधवल दिसते. हल्ला होत असल्यास तो बचाव करत निघून जातो किंवा प्रतिहल्ला करतो. साप दूध पितो. पुंगीच्या तालावर डोलतो. बदल घेतो. नागाच्या डोक्यावर नागमणी असतो. 100 वर्षे जगलेला साप मानवी अवतार घेतो. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते. सापांच्या अंगावर केस असतात. साप पुरातन धनाचे रक्षण करतो. सापाचे विष मंत्राने उतरवता येते. साप पकडण्याचे मंत्र असतात. गर्भवती स्त्री व साप यांची नजरानजर झाल्याने जन्माला येणारे मूल जीभ चाटणारे बनते. एक नव्हे, अनेक अंधश्रद्धा असून त्या खोट्या आहेत.
प्रत्येक सरकारी दवाखान्यात सर्पदंश लस असणे अनिवार्य आहे. याबरोबर विषारी बिनविषारी सापांच्या माहितीचा फलक असणे अवश्य आहे. तत्काळ उपचार करण्यास वैद्यकीय अधिकारी हजर असणे आवश्यक आहे. अनेक सर्पमित्र कोणताही मोबदला न घेता साप पकडण्याचे काम करतात. त्यात काही साप पकडण्याचे स्टंट करतात. असे करत असताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. साप हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूचित येतात साप पकडून घरी ठेवणे, त्यांना मोकळे सोडून परत पकडणे, त्यांचे प्रदर्शन मांडणे, सोशल मीडियावर प्रसारित करणे, असे अनुचित प्रकार केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. सर्पमित्रांना फ्रंटलाइन वर्कर्स दर्जा व दहा लाखांचा विमा देण्यात आला आहे. सर्पमित्रांना सर्पमित्र म्हणून त्यांची नोंद जिल्हा वन विभाग कार्यालयात करून सापांबाबत अधिक माहिती
घेता येते.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…