संपादकीय

भगवान महावीर यांच्या विचारांची गरज

अतुलनीय वैभवाचा त्याग करून त्यांनी दीक्षा घेऊन बारा वर्षांपर्यंत कठोर तपसाधना केली. अदम्य साहस, अपरिजेय संकल्प आणि अनंत आत्मबल यांच्या जोरावर मानव, दानव व देवनिर्मित उपसर्ग, कठोर यातना सहन केल्या. त्या साधनेमुळे महावीरांना प्राप्त झालेली उपलब्धी म्हणजे सर्वज्ञता, केवळज्ञान, केवळदर्शनाची प्राप्ती. ते मुक्तीच्या दारावर पोहोचले. त्यानंतर धर्मतीर्थाची स्थापना करून श्रमण-श्रमणी, श्रावक-श्राविका या चतुर्विध संघाची रचना केली. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पंचयाम धर्माचा पुरस्कार केला. सामाजिक क्रांतीचा उद्घोष करून जातीयवाद, गुलामगिरी प्रथा, स्त्रीवर्गावर होणारे अत्याचार, कनिष्ठ दर्जा, अस्पृश्यता, समाजाचे होणारे नैतिक अध:पतन या सर्वांचा निषेध केला.
आज जगात धार्मिक, राजकीय आणि सामरिक हितसंबंधांमुळे अनेक देशात मतभेद आहेत. आर्थिक वर्चस्व, सुरक्षा, अणुकार्यक्रम, धार्मिक दशहतवादी कारवायांमुळे जग संत्रस्त झाले आहे. इराण विरुद्ध इस्राइल-अमेरिका युद्ध, युक्रेन- रशिया संघर्ष यामुळे जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. सोशल मीडिया व दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या बातम्या, प्रचंड क्षेपणास्र, ड्रोन हल्ल्यांचे विदारक दृश्य बघून मन सुन्न होते. खरेतर युद्ध, हिंसा हे कोणत्याही समस्यांचे उत्तर नाही. हिंसा हा विकासाचा नव्हे, तर विनाशाचा मार्ग आहे. युद्धामुळे प्रचंड विध्वंस, आर्थिक नुकसान, मानव जीवितहानी, अन्न व इंधनटंचाई, पर्यावरण दुष्परिणाम, निर्वासितांची समस्या निर्माण झाली आहे. सर्व जगाला कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. युद्ध थांबवणे गरजेचे असूनसुद्धा त्यातून बाहेर पडण्याचे सोयीस्कर मार्ग सापडत नाहीत, ही शोकांतिका आहे. दोन्ही पक्ष अहंकार, मानहानीच्या नामुष्कीने संवाद साधण्यास तयार नाहीत. त्यामुळे युद्धविरामाची शक्यतासुद्धा धूसर झाली आहे. संपूर्ण जग मानसिक तणाव, असुरक्षितता, महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमूळे होरपळत आहे.
या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी महावीरांचे जीवनदर्शन, तत्त्वचिंतन इतके वैज्ञानिक, सर्वकालिक आहे की, विश्वातील संपूर्ण जटिल समस्यांचे निराकरण करण्यास समर्थ आहे. भगवान महावीरांनी मानव हितार्थ दिलेले चार मुख्य सिद्धांत म्हणजे जीवनात अहिंसा, विचारांमध्ये अनेकांत दृष्टी, वाणीमध्ये स्यादवाद, अपेक्षावाद व समाजात अपरिग्रह सिद्धांत. भगवान महावीरांच्या अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह तत्त्वाचा सर्वांनी मन:पूर्वक स्वीकार केला केला तर व्यावहारिक समझोता होऊन हा विनाश टाळता येईल. क्षमेची देवाणघेवाण हा जैन संस्कृतीचा प्राण आहे. क्षमाप्राप्तीसाठी अहंकार बाधक आहे, तर क्षमा करण्यासाठी तिरस्कार. क्षमा विरस्य भूषणम। क्षमाशील असणे गरजेचे. महावीरांचा प्रथम संदेश अहिंसाच आहे. सामाजिक विषमतेचे मूळ कारण हिंसाच आहे.
जगा आणि जगू द्या, अहिंसा परमो धर्म:, आत्मवत सर्व भुतेषु हाच संदेश महत्त्वाचा आहे. सर्व प्राणिमात्रांना आत्मवत समजून कोणालाच कष्ट देऊ नका, छळू नका, मारू नका. मानवाची सृजनात्मक स्वतंत्रता, मौलिक अधिकारांची सुरक्षा केवळ अहिंसाच देऊ शकते. अहिंसा विश्वासाची जननी आहे आणि विश्वास परस्परस्नेह, सदभाव, सहयोगाचा, सर्व धर्मांचा मूलाधार आहे. वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक सर्व समस्यांचे समाधान अनेकांतवाद व अपरिग्रहात आहे. सर्वधर्मसमभाव हा अनेकांतवादाचा उत्तम आविष्कार आहे. विश्वधर्माचा पाया आहे. वस्तूतील अनेक विरोधी तत्त्वांना सापेक्ष दृष्टीने बघणे, स्वीकारणे म्हणजे अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे एकच सत्य अनेक प्रकाराने व्यक्त करण्याची पद्धती होय. अनेक वेळा सत्याचे स्वरूपसुद्धा विविधांगी असते. सत्यासाठी हट्टाग्रह, दुराग्रह नको म्हणून स्यादवाद तत्त्वाची निर्मिती केली. वस्तूमध्ये असलेल्या अनेक धर्मांचे सापेक्ष दृष्टीने विवेचन करणे म्हणजे स्यादवाद.
सार्‍या ठराविक चाकोर्‍या, सार्‍या संकुचितता परम सत्याला प्रकट करू शकत नाहीत म्हणून प्रत्येक वक्तव्यास स्यात (कथंनश्चित, परहॅप्स) शब्द जोडतात. सत्यासंबंधी सारी वक्तवे एकाचवेळी सार्थक होऊ शकतात. प्रत्येक वस्तूचे अपेक्षापूर्वक विश्लेषण केल्यास सात विकल्प बनतात. यालाच सप्तभंगी म्हणतात. विरोधकांचा दृष्टिकोन पारखून, आपला एकांगी दृष्टिकोन सोडून स्यादवाद तत्त्वाचा अवलंब केल्यास समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही. अनेकान्त मन शुद्धीसाठी आहे, तर स्यादवाद वचन शुद्धीसाठी आहे. जेव्हा अशा प्रकारे वैचारिक समन्वयाचा सुंदर संगम होईल तेव्हा गुंतागुंतीच्या, अडीअडचणीच्या सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होईल.
कोणतीही वस्तू संपूर्ण स्वरूपात मोह, ममता, बुद्धिपूर्वक अमर्यादित स्वरूपात असक्तीने ग्रहण करणे म्हणजे परिग्रह. अपरिग्रही बनण्यासाठी, इच्छेवर नियंत्रण मिळविण्यासाठी इच्छा नियमन व्रत तर अमर्यादित भोगापभोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भोगापभोग नियंत्रण व्रत सांगितले आहे. गरजेपेक्षा जास्त असलेल्या वस्तूंचा सहोदर बंधू समजून उचित हिस्सा दान देण्याचा उपदेश केला आहे. सत्यम् शिवम सुंदरम्चे प्रतीक असलेले पुनित भ. महावीर चरित्र अनंतकाळ जीवनोत्थानाचा अमर संदेश देत राहील.

The need for the thoughts of Lord Mahavira

 

भगवान महावीरांच्या तत्त्वाचा स्वीकार केला केला विनाश टाळता येईल.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago