– विलास बोडके
मुंबईच्या लोकल किंवा मेट्रोमध्ये प्रवास करीत असाल,
तर आपल्याला पुढील स्थानकाची माहिती अगोदरच मिळते. विकासाबाबत आता नाशिक हे पुढील स्थानक असल्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूक परिषदेत जाहीर केले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिकने विकासात गती घेतली आहे. त्यामुळे विकासाचे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक हेच असणार आहे.
नाशिक आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक असा समृद्ध वारसा लाभलेले शहर. औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, पर्यटन विकासात अग्रेसर शहर आता विकासाकडे द्रुतगती मार्गाने वाटचाल करीत आहे. या वाटचालीस राज्य शासनाने पायाभूत सोयीसुविधा, गुंतवणुकीस पोषक वातरण तयार केले. त्यातच पुढील वर्षी होणार्या कुंभमेळ्यानिमित्त विविध विकास कामे पूर्ण झाल्यानंतर या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आपणास दिसणार आहे.
1990 च्या दशकापर्यंत नाशिक शहर हे नाशिक विभाग आणि जिल्ह्याचे मुख्यालय, आल्हाददायक हवामान, देशाची आणि राज्याची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्र्यंबकेश्वर, दर 12 वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा, सप्तशृंगी देवी मंदिर, मुक्तीधाम मंदिर, मिग विमानाचे ओझर, चलार्थ पत्र मुद्रणालय (नोट प्रेस), मुंबई आग्रा आणि मुंबई दिल्ली या लोहमार्गावरील एक महत्वाचे शहर, कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव, पिंपळगाव. द्राक्ष, डाळिंब, कांदा उत्पादनात अग्रेसर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भगूर, कवी कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, दादासाहेब गायकवाड, काळाराम मंदिर सत्याग्रह आणि भारतीय सैन्य दलाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट मुळे नाशिक शहर ओळखले जात असे किंवा या शहराचा नावलौकिक होता.
औद्योगिक, कृषी क्षेत्रातील विकासामुळे या शहरात रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने या शहराकडे अनेकांचा ओघ वाढला. त्यात राज्याच्या विविध भागासह खानदेशातील तीनही जिल्ह्यातील अनेक तरुण येथे रोजगारासाठी दाखल झाले. त्यापैकी अनेजण कायमचे नाशिकवासी झाले. त्यांच्या आता दुसर्या, तिसर्या पिढ्या नाशिककर झाल्या आहेत. त्यातच 1991 मध्ये देशाने स्वीकारलेले उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणामुळे या शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणूक वाढू लागली. आधी महिंद्राचा प्रकल्प येथे होताच. त्याच्या विस्तारासह वेगवेगळे उद्योग या शहरात स्थिरावू लागले. सातपूर, अंबड औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला. त्यापाठोपाठ सिन्नर (माळेगाव, मुसळगाव), इगतपुरी, दिंडोरी, अक्राळे, मालेगाव, येवला (हा भाग पैठणीसाठी प्रसिद्ध आहे.) आदी भागात औद्योगिक विकास होऊ लागला. त्यातच 1990 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तर 1998 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या शहरात स्थापन झाले. 1991-92, 2003- 04 आणि 2015 च्या कुंभमेळ्यानिमित्त या शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आणि या शहराने आपली कूस बदलण्यास सुरुवात केली.
मुंबईपासून जवळ, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीची सुविधा, आल्हाददायक हवामान, पाण्याची मुबलक उपलब्धता (नाशिक धरणांचा जिल्हा म्हणून ही ओळखला जातो.), मोठ्याप्रमाणात उपलब्ध कुशल, अकुशल आणि स्वस्त मनुष्यबळ यामुळे या शतकाच्या पहिल्या दशकांत या शहराने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यातून मोठमोठे प्रकल्प या शहरात आणि जिल्ह्यात सुरू झाले. त्यांना राज्य शासनाच्या विविध विभागांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यातून अर्थकारणाला गती मिळाली. द्राक्ष आणि कांदा उत्पादन आणि निर्यातीला चालना मिळाली. कृषी प्रक्रिया उद्योग स्थापन झाले. दर्जेदार द्राक्ष उत्पादन यामुळे नाशिक वाइन कॅपिटल म्हणून देशात ओळख निर्माण झाली.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग, नव्याने विकसित होणारे वाढवण बंदर आणि त्याच्याशी जोडले जाणारे नाशिक शहर, सुरत-चेन्नई महामार्ग, नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणखी बळकट होण्यास मदत होणार आहे.
या जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय विस्तारीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), जिल्हा उद्योग केंद्र नेहमीच तत्पर आणि प्रयत्नशील असतात. जिल्हा प्रशासनातर्फे अलीकडेच उद्योग समिट पार पडले. त्यातून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली. जिल्ह्याची औद्योगिक विकासाची घौडदौड सुरू असताना नाशिक शहराचा विस्तार चौफेर होत आहे. कधीकाळी मर्यादित असलेल्या या शहराने चामर लेणीपासून ते पांडव लेणीपर्यंत विस्तार केला आहे. या शहराची लोकसंख्या आता 25 लाखापर्यंत पोहोचली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी भरणार्या कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात तब्बल 35 हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे सुरू आहेत. यामुळे पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन या शहराचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. त्यात नाशिक विमानतळाचा ही समावेश आहे. या विमानतळावरून आता देश विदेशात पोहोचणे सहज शक्य झाले आहे. आगामी काळात विमानांची ये जा वाढणार आहे. त्यातून ही विविध उद्योग घटकांच्या विकासाला चालना मिळणार आहे. नाशिक येथे आयटी पार्क प्रस्तावित आहे. त्यातून ही या शहराचा चेहरा बदलण्यास मदत होणार आहे.
आध्यात्मिक आणि ऐतिहासिक नगरी असलेल्या नाशिक सह जिल्ह्यात पर्यटन वृद्धी आणि त्यातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. या जिल्ह्यात साल्हेर सारखा जागतिक वारसा मिळालेला किल्ला, रेणुकादेवी मंदिर, येवला येथील पैठणी उद्योग, गोंदे येथील पुरातन मंदिर, पावसाचा प्रदेश इगतपुरी, त्र्यंबकेश्वर अशी विविध पर्यटन स्थळे आहेत.
एकूणच, नाशिकची वाटचाल आता केवळ धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून मर्यादित राहिलेली नाही. तर देशाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व त्यांना जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी यांची लाभणारी भक्कम साथीमुळे नाशिक जिल्हा
उद्योग, कृषी, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्याच्या तयारीत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणार्या पायाभूत विकासकामांना औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीची जोड मिळणार असून नाशिकच्या विकासाला आणखी वेग येणार आहे.
मुंबई-पुण्यानंतर राज्याच्या विकासाच्या नव्या पर्वात नाशिकचे स्थान अधिक भक्कम होत आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधून नाशिक हे केवळ महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर न राहता देशाच्या विकासाच्या नकाशावर ठळकपणे उमटेल. अध्यात्माची परंपरा, उद्योगाची ताकद, कृषीची समृद्धी आणि आधुनिकतेची कास यांचा सुंदर संगम असलेले नाशिक आता नव्या उंचीवर झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे.
The Next Destination for Development: Nashik