जिल्ह्यात टँकरची संख्या वाढली

384 गाव-वाड्यांना पाणीपुरवठा

नाशिक : प्रतिनिधी
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यात 29 मे रोजी 126 टँकरद्वारे 384 गाव व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. या टँकरद्वारे सुमारे दोन लाख 28 हजार 922 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात
आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती येवला तालुक्यात असून, येथे 83 गाव-वाड्यांना 33 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर मालेगाव तालुक्यात 64, तर सिन्नर 65 गाव-वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागते. इगतपुरीत 42 गाव-वाड्यांसाठी 21 टँकर कार्यरत असून, नांदगावात 32, चांदवड 21, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 20 गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, बागलाण, नाशिक व निफाड तालुक्यात सध्या टँकरची आवश्यकता भासलेली नाही, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील विहिरींची पातळी घटल्याने प्रशासनाने 21 विहिरी गावांसाठी अधिग्रहित केल्या आहेत. टँकर भरण्यासाठी 49 विहिरींचा वापर केला जात आहे. अनेक भागांत दररोज अनेक फेर्‍या करून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत असल्याने प्रशासनावरही ताण वाढला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 170 टँकर सुरू होते, तर यंदा ही संख्या 126 वर असली, तरी पाणीटंचाईची झळ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लवकर पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The number of tankers in the district has increased.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *