सिडको : प्रतिनिधी
जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना जेलरोड परिसरात घडली. या घटनेत सुमारे 60 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीस गेली. द्रोपदाबाई रामदास बच्छाव (वय 72, रा. राधाई बंगला, सप्तशृंगीनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्छाव या रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या घरासमोरून चालत गीता गौरी सोसायटीसमोर आल्या असता रात्री पावणेनऊच्या सुमारास काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हासारख्या दिसणार्या मोपेडवरून एक तरुण त्यांच्या दिशेने आला.
अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील या तरुणाने डोक्यावर लाल रंगाची टोपी घातली होती. त्याने मोपेड महिलेच्या जवळ आणून वेग कमी केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून तोडली. त्यानंतर त्याने मोपेड भरधाव वेगाने मधुबन बिअर शॉपीच्या दिशेने नेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बच्छाव यांनी आरडाओरड केली. मात्र, परिसरातील नागरिक मदतीसाठी येईपर्यंत चोरटा तेथून पसार झाला होता. चोरीस गेलेल्या पोतीमध्ये सोन्याच्या साखळीत गुंफलेले ओम डिझाइनचे छोटे पान असून, तिचे वजन अंदाजे सव्वा तोळे आणि किंमत सुमारे 60 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
The *pot* (traditional beaded necklace) was snatched from the neck of a woman who had stepped out for her post-meal walk.