संपादकीय

आजही अपूर्ण आहे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया

जगातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांची असूनही पुरुषांच्या तुलनेत त्या दोन तृतीयांश काम करतात, तरीही एकूण उत्पन्नापैकी फक्त दहावा हिस्सा त्यांना मिळतो. स्त्रियांचे कामकाजाचे तास पुरुषांपेक्षा जास्त असतात. कारण मुलांची काळजी ते घरगुती जबाबदार्‍यांपर्यंतची सर्व जोखीम बहुतेक स्त्रियांवरच असते. जरी पुरुष आता घरकामांत मदत करू लागले असले, तरी त्यांची संख्या अजूनही फारच कमी आहे. याशिवाय उत्पन्नार्जनातही स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. तरीही बहुसंख्य स्त्रियांना आजही कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: ग्रामीण भागातील निरक्षर आणि अल्पशिक्षित स्त्रियांकडे वाचन-लेखनासाठी वेळ नसतो, ज्या थोड्याफार शिकलेल्या आहेत, त्यांच्याकडे सुविधांचा अभाव असतो. अशा परिस्थितीत, स्त्रियांचे खर्‍या अर्थाने सक्षमीकरण हा आजही एक प्रमुख मुद्दा बनून राहिला आहे.
खरंतर सक्षमीकरण हा आज विकासाच्या मुख्य प्रवाहातील एक खूप चर्चित शब्द आहे. ही एक अशी संकल्पना बनली आहे, जी केवळ व्यक्तिमत्त्वाच्या ओळखीपुरती मर्यादित नसून, व्यापक अर्थाने मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या विश्लेेषणाशीही निगडित आहे. सक्षम व्यक्ती म्हणजे जिच्यात आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची जाणीव असते, जिला तिच्या सामाजिक-राजकीय वातावरणाचे विश्लेषण करण्याची दृष्टी असते आणि जी आपल्या जीवनावर परिणाम करणार्‍या निर्णयांमध्ये बदल घडवण्याची क्षमता ठेवते.
स्त्री सक्षमीकरण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात स्त्रिया घरगुती, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या हक्कांना ओळखून, त्यांचा वापर करत जगण्यावर स्वतःचे नियंत्रण ठेवतात. सक्षमीकरण म्हणजे स्त्रिया वैयक्तिक निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम असणे, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय निर्णयप्रक्रियेत सहभागी होणे, तसेच स्वतःचे ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी स्वतंत्र असणे. सक्षमीकरणाला सहा आयामांत विभागता येते- बौद्धिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर सक्षमीकरण. बौद्धिक सक्षमीकरण म्हणजे स्त्रिया समाजातील त्यांच्या दुय्यम दर्जाची कारणे स्थूल आणि सूक्ष्म रूपात समजून घेणे. पण आजच्या परिस्थितीत बघितले तर, बौद्धिक सक्षमीकरणाची छायासुद्धा स्त्रियांच्या मोठ्या वर्गाला स्पर्श करू शकलेली नाही. आजही जुन्या परंपरा आणि मान्यता यांना न विचारता, न समजता त्या पाळल्या जात आहेत.
मानसिक सक्षमीकरण स्त्रियांमध्ये स्वतःची स्थिती सुधारण्याची भावना विकसित करते. याचा अर्थ असा की, त्यांच्यात हा विश्वास दृढ होतो की, बदलाच्या प्रयत्नांमध्ये त्या यशस्वी होऊ शकतात. यामुळे त्यांच्यात दृढता, आत्मविश्वास, निर्भयता आणि धैर्य सारख्या गुणांचा विकास होतो. पण मानसिक सक्षमीकरणही स्त्रियांच्या संदर्भात फारसे अर्थाचे राहिलेले नाही. कारण जेव्हा त्या स्वतःच्या स्थितीत बदलाची कल्पनाच करू शकत नाहीत, तेव्हा ती सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आर्थिक सक्षमीकरण स्त्रियांना उत्पादकतेशी जोडून त्यांना काहीअंशी स्वावलंबी बनवते. मोठ्या संख्येने स्त्रिया उत्पादनक्षम होऊन उत्पन्न मिळवू लागल्या आहेत, पण त्यापैकी बहुतेकींना ते पैसा खर्च करण्याचा अधिकार नसतो. कारण त्या बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र झालेल्या नसतात आणि त्यांच्याकडे कायदेशीर माहितीचाही अभाव असतो. याखेरीज, घर-कुटुंब आणि मुलांबाबतची जबाबदारी त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करते. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत. सक्षमीकरण केवळ व्यक्तिगत जागृतीवर अवलंबून नसून, ते समूहाच्या जागृती आणि कृतीशीही निगडित आहे. पूर्वी राजकारणात स्त्रियांची संख्या नगण्य होती, पण आज परिस्थिती बदलली आहे. स्त्रिया आता राजकीय क्षेत्रात दिसू लागल्या आहेत. राजकारणातील 33 टक्के आरक्षणाने स्त्रियांसाठी विकासाचा नवा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, एका सामान्य स्त्रीसाठी राजकारणात येणे आणि टिकून राहणे हे एक मोठे आव्हानच आहे. ग्रामीण भागात पाहिले तर तेथील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
सामाजिक सक्षमीकरण म्हणजे समाजातील विविध वर्ग, संस्कृती आणि कामकाजामधील सत्तेविभागणीत बदल घडवणारी प्रक्रिया. पूर्वी स्त्रिया सामाजिक विकासाच्या पैलूंबद्दल अनभिज्ञ होत्या, पण आज परिस्थिती बदलली आहे. स्त्रिया समाजाच्या परिस्थितीवर नजर ठेवत आहेत आणि सामाजिक विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केवळ स्त्रियांचा सहभागाने त्यांचे सक्षमीकरण शक्य नाही. पुरुषांनाही स्त्रियांच्या सामाजिक सक्षमीकरणात आपली भूमिका निश्चित करावी लागेल.

मच्छिंद्र ऐनापुरे

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago