नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जावे यासाठी एटीएमची निर्मिती करण्यात आली. एटीएमच्या निर्मितीमुळे बँकेत जात तासनतास उभे राहण्याच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकही एटीएमचा वापर करत असतात. मात्र बँकांनी खर्च कमी करण्यासाठी एटीएम बाहेरील सुरक्षा रक्षक हटवून फक्त सीसीटिव्हीवरच भरवसा ठेवला आहे. परिणामी चोरट्यांकडून एटीएम लक्ष्य केले जात आहे.
शहरातील सातपूर परिसरात दोन दिवसापूर्वी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र यामुळे एक प्रश्नही निर्माण झाला आहे की शहरातील एटीएमच्या सुरक्षेच्याबाबतीत दुर्लक्ष होत आहे का? शहरात वारंवार घरफोडीच्या घटना घडत असताना चोरट्यांची मजल आता एटीएम फोडण्यापर्यंत गेली आहे. शहरातील सातपूर परिसरात चोरट्यांने दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागरिक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असतात अशा वेळी चोरट्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याचीही भीती वर्तविण्यात येत आहे. शहरातील अनेक एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याचे चित्र आहेत. त्यामुळे नागरिकांना एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाण्याची भीती वाटत आहेत.