– राजेश शिरभाते
मैत्री या विषयावर जातक व अनेक बोधकथा आहेत. कोणाशी मैत्री करावी, कोणाबरोबर करु नये, याची शिकवण वेगवेगळ्या कथांमधून देण्यात आलेली आहे. अनेकांनी या कथा वाचल्या नसतील मात्र, केवळ स्वार्थापोटी आपला मित्र झालेला भाजपा पुढे संधी मिळाल्याबरोबर आपल्या घरात कशी आग लावू शकतो, हे शिवसेना व भाजपाच्या मैत्रीने दिसले आहे. भाजपाच्या सांगण्यावरून आणि त्यांनी दिलेल्या शक्तीने शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आहे.
शिवसेनेचे सहा खासदार फुटून ते आता भाजपाच्या वळचणीला गेलेले आहेत. वास्तविक पाहता ही मंडळी भाजपच्या विरोधात लढली. त्यांना लोकांनी त्यासाठी मतदान केले होते. आपले काही प्रश्न किंवा सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे किंवा त्यांच्याकडून जनतेच्या हिताची कामे करून घेण्यासाठी त्यांना लोकांनी निवडून दिले होते. मात्र, हे सगळे आता भाजपाच्याच वळचणीला गेले आहेत. त्याबद्दल त्यांना काही लाभ मिळेल. त्यातील एकाला केंद्रात राज्यमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहून आता आपले काही बरे होणार नाही. आपला राजकारणाचा धंदा चालला पाहिजे म्हणून आता आपल्याला दुसरे दुकान बघितले पाहिजे, अशा साध्या सोप्या विचाराने ते गेलेले आहेत. त्यातला एकतर आपल्या वडिलांच्या केसचा न्यायालयातला निकाल आपल्या बाजूने लावून देऊ, या बोलीवर गेल्याची चर्चा आहे. या सार्यांमध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आपल्या निष्ठेने खरे राजे म्हणून उठून दिसतात. ते लोकांमध्ये मिसळतात, शिवसैनिक त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करतात. जे आपल्या फायद्यासाठी सत्ताधारी पक्षात गेले आहेत ते कुठेतरी लपून बसले आहेत. याआधीचे गुवाहाटीला गेले होते. कदाचित हेही तशाच एखाद्या पंचतारांकित ठिकाणी पुढील आदेशाची वाट पाहत असावेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या समर्थकांनी या खासदारांना गद्दार म्हणत त्यांचे पुतळे वगैरे जाळले. खर्या शिवसैनिकांना याचा राग आला. त्यामुळे या फुटलेल्या खासदारांना आता वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा ते आपल्या मतदारसंघात फिरतील तेव्हा त्यांच्याबरोबर सरकारी गाड्यांचा आणि पोलिसांचा मोठा ताफा असणार आहे. वास्तविक या सहाही खासदारांबद्दल शिवसैनिकांनी इतका राग बाळगण्याचे कारण नाही. यातील काही लोक हे केवळ आपल्या फायद्यासाठीच शिवसेनेत आले होते. एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा ही माणसे त्यांच्याबरोबर गेली नव्हती. कदाचित त्यावेळी याच्या आर्थिक वा इतर वाटाघाटी फिसकटल्या असाव्यात म्हणून ते राहिले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे काय होते ते पाहूया आणि नंतर निर्णय घेऊया असाही विचार त्यांनी केला असेल. त्यानंतर निवडणुका झाल्या लोकसभेच्या वेळी भाजपा काहीसा गाफील राहिला होता. त्यामुळे त्यांनी त्यावेळी आपली नेहमीची यशस्वी ज्ञानेश नीती वापरली नव्हती. त्या निवडणुकीत लोकांनी भाजपाविरोधी मतदान केले. त्यात हे सहा जण खासदार झाले. त्यातले अनेक तर शिवसेनेत नसते तर आलेच नसते. मुलुंड, भांडूप इथला सध्याचा खासदार तर शिवसेनेत नसता तर निवडूनही आला नसता. त्याने त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. हे सर्वजण दिल्लीत गेले. त्यानंतरही त्यांनी दिल्लीत काही खास कामगिरी केली. पक्षासाठी काही योगदान दिले असे झाले नाही. एकाने तर आपल्या फुटल्याचे कारण बायकोची विचारपूस केली नाही, असे हास्यास्पद दिले. आता त्याच्या कुटुंबाची नीट विचारपूस होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. त्यावेळी ते योग्य संधीची वाट पाहत राहिले. ती संधी त्यांनी आता मिळाली. सध्याचे केंद्र सरकार हे काही भाजपाचे संपूर्ण सरकार नाही. चंद्राबाबू नायडू व नितीश कुमारांचा आधी असलेला पक्ष यांच्या जोरावर ते टिकलेले आहे. त्यातल्या नितीश कुमारांच्या पक्षाचा भाजपा आता चोळामोळा करून टाकला आहे. चंद्राबाबूंना ते हात लावू शकत नाहीत. दक्षिणेमधील लोक संवेदनशील आहेत. हा भाग समृद्ध आहे आणि त्यांना आतापर्यंत चांगले नेते मिळालेले असल्यामुळे ते काहीही करू शकतात. त्यामुळे आपले संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपाला आता इतर खासदारांची गरज होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर भाजपाचा आधी घरोबा होता. त्यामुळे त्यांना घरातल्या गोष्टी माहीत होत्या. त्याचा फायदा घेत भाजपाने आताही शिवसेना फोडली आहे. भाजपा जरी आपला याच्याबरोबर काही संबंध नाही, असे म्हणत असला, तरी त्याच्यावर या देशातील शेंबडं पोरगंही विश्वास ठेवणार नाही. लोक इतकेही मूर्ख नाहीत. शिवसेना पक्ष व चिन्ह घेतलेले एकनाथ शिंदे म्हणतात की, पक्ष फोडायला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकटा शिकार करत असतो. त्याला लांडग्याचे प्लॅनिंग लागत नाही. जर भाजपा आणि सरकारी यंत्रणा त्यात चंद्रचूडही आले जर नसते तर एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन गेले असते का, असा प्रश्नही या वाक्यावर उपस्थित केला जात आहे. असो ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याची इच्छा असते. त्यानुसार ते करत असतात.
या सार्या प्रतिकूल स्थितीत गेल्या आठवड्यात काही सकारात्मक घटनाही घडल्या आहेत. एकतर शिवसेनेचे सहा खासदार फुटले असले, तरी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे त्यांच्याबरोबर गेले नाहीत. ते गेले नाहीत हा त्यांचा निर्णय होता. मात्र, त्याला लोकांनी जो
उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो विचार करायला लावणारा होता. वास्तविक सर्वसामान्य लोकांना खासदारांच्या फुटण्याचा आणि इतर कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही. मात्र, आपण ज्या विचाराने मत दिले तो विचारच जर एखादा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्या पक्षात जातो याचा त्यांना राग येतो. या खासदारांना असे वाटते की, आपण सत्तेत आहोत म्हणून आपल्याला मान आहे. मात्र, अशा लोकांना सामान्य माणसांच्या नजरेत काहीही मान नसतो. लोक कामापुरते यांच्याशी चांगले बोलतात नंतर यांना शिव्याच घालतात. एकेकाळी सत्ता आणि राजकारण यात फरक होता. जेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हाही भाजपाचे त्या वेळेसच्या नेत्यांबद्दल सामान्यांच्या मनात आदर होता. आता त्यांना जो मान आहे तो व्यक्ती म्हणून नव्हे तर केवळ पदाचा आहे. ही माणसे जेव्हा पदावरुन जातील तेव्हा त्यांच्याकडे केवळ पैसा असेल समाधान तर त्यांना स्वतःलाही मिळणार नसेल. एकेकाळी जंगलात वाघ म्हणून वावरणार्याला जर गळ्यात पट्टा बांधून शेतात राखणीला ठेवला तर त्याची काय अवस्था होईल अशीच काहीशी अवस्था यांची होत असणार. पुढचा काळच याची उत्तरे देणार आहेत.
शुक्रवारी देशाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हे पहिल्यांदाच असे घडले. त्यातील उत्स्फुर्ता जाणवणारी होती. या आधी असे झाले नव्हते. संघाने कोट्यावधी रुपये खर्च करुन राहुल गांधी यांचे प्रतिमाभंजन केले होते मात्र त्यांचे है पैसै वाया गेले असेच म्हणावे लागेल. लोकांना आपापल्या पातळीवर कार्यक्रम केले. स्टेट्स ठेवले. समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या. हे कोणाही कोणाला करायला सांगितले नाही. काँग्रेस पक्षाकडून दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर रोजगार मेळावा झाला. हा कार्यक्रम वगळता पक्षानेही राहुल गांधी यांच्या व्यक्तीगत जीवनाचा आदर राखत साधे कार्यक्रम आयोजित केले. त्याला जो प्रतिसाद मिळाला.
लोकांनी राहुल गांधी विषयी जे मत व्यक्त केले त्यांच्या विषयीच्या ज्या आठवणी सांगितल्या त्यावरून लोकांना त्यांना या देशाचा खरा नेता म्हणून स्वीकारले असल्याचे काल प्रकर्षाने जाणवले. हा देश विचारवंतांचा आहे. चार-दोन खासदार पैशांसाठी इकडेतिकडे गेल्याने काहीही फरक पडत नाही. असाच उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमाला मिळाला. तिथेही लोक उत्स्फूर्तपणे आले. त्यांनी मोठी गर्दी केली. ही आणलेली गर्दी नव्हती. पैसे देऊन बोलावलेले हे लोक नव्हते. आपल्या खिशातील पैसे खर्च करून आलेली ही मंडळी होती. भाजपा शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना विकत घेऊ शकते. लोकप्रतिनिधींना कायद्याच्या विविध कलमांमध्ये बसवून खटपटी लटपटी करू शकते. मात्र लोकांची निष्ठा, प्रेम, आदर विकत घेऊ शकत नाही हेही काही घटनांनी सिद्ध झाले. एकीकडे लोकशाहीला धोका दिसत असतानाच दुसरीकडे त्याविषयीची आशाही तेवत ठेवणारी मंडळी आहेत. हे या सार्याचे फलितच म्हणाले लागेल.
The split in the Shiv Sena