इराण-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक शांतता करार
♦ इराणच्या आण्विक कार्यक्रमावर स्वतंत्र चर्चा होणार
♦ लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर तत्काळ युद्धबंदी
♦ येत्या शुक्रवारी जीनिव्हा येथे करारावर स्वाक्षर्या
♦ तीन महिन्यांचे युद्ध संपवण्यावर ऐतिहासिक सहमती
वॉशिंग्टन : तेहरान
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम देणारा एक ऐतिहासिक शांतता करार (पीस डील) निश्चित झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ’ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर या कराराची अधिकृत घोषणा करत करार पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी एक महत्त्वाची चौकट तयार केली. येत्या शुक्रवारी (दि. 19 जून) स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे या करारावर अधिकृत स्वाक्षर्या केल्या जाणार आहेत. या करारातील सर्वांत महत्त्वाचा आणि तत्काळ लागू होणारा मुद्दा म्हणजे, जागतिक ऊर्जा आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ’होर्मुझची सामुद्रधुनी’ मार्ग पुन्हा खुला करणे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेची नौदल नाकेबंदी तत्काळ उठवण्याचे आणि हा मार्ग विनाशुल्क खुला करण्याचे आदेश दिले आहेत. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझम गरिबाबादी यांनी या कराराला दुजोरा दिला. अमेरिकेने आपल्या वचनबद्धतेचे पालन केल्यास आणि करारावर स्वाक्षर्या झाल्यानंतर पुढील 60 दिवसांच्या अंतिम वाटाघाटींच्या प्रक्रियेत सहभाग घेण्याची अट ठेवली आहे. इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमावर या करारात सध्या कोणताही निर्णय झालेला नसून, त्यावर भविष्यात स्वतंत्रपणे वाटाघाटी होणार आहेत.
या अत्यंत गुंतागुंतीच्या शांतता प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावणार्या पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, या करारामुळे लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तत्काळ आणि कायमस्वरूपी थांबवण्यात येतील. लेबनॉन हा या वाटाघाटींमधील एक अत्यंत कळीचा मुद्दा होता. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही सोमवार रात्रीपासून सर्व लष्करी कारवाया थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, इस्राईलने मात्र आपण या अमेरिका-इराण वाटाघाटींचा भाग नसल्याचे सांगत अद्याप या घडामोडींवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
या करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक राजकारणावर मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार असल्याच्या बातमीने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 4 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत, तर आशियाई शेअर बाजारात, जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि भारताच्या निफ्टी-सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. या घडामोडींचे युरोपातील प्रमुख देशांनी (ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली) स्वागत केले आहे. इराणने आपल्या आण्विक कार्यक्रमावर पारदर्शक आणि पडताळणीयोग्य पावले उचलल्यास त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध शिथिल करण्याची तयारी युरोपीय देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे दर्शवली आहे.
युद्धात मारले गेलेले इराणचे प्रमुख नेते
’अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण’ युद्धाची सुरुवातच अत्यंत धक्कादायक होती; कारण फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या पहिल्याच अचूक हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा त्यांच्या तेहरानमधील निवासस्थानी खात्मा करण्यात आला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि सर्वोच्च स्तरावरील अनेक अधिकारी एकाच हल्ल्यात मारले गेले.
खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इस्रायल आणि अमेरिकेने आपले लक्ष्यभेदी हल्ले सुरूच ठेवले, ज्यामध्ये इराणच्या लष्करी व राजकीय उच्चभ्रू वर्गाची एक संपूर्ण फळी नष्ट झाली. या युद्धात इराणचे लष्करप्रमुख अब्दोलरहीम मौसवी, ’आयआरजीसी’चे कमांडर मोहम्मद पाकपौर, संरक्षण मंत्री अझीझ नासीरजादेह आणि संरक्षण परिषदेचे सचिव अली शामखानी यांसारखे सर्वोच्च अधिकारी मारले गेले. या लष्करी हानीव्यतिरिक्त, 17 मार्च रोजी सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांची इस्रायली हल्ल्यात हत्या करण्यात आली; तर गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब आणि ’आयआरजीसी’चे गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांनाही या संयुक्त कारवायांमध्ये आपले प्राण गमवावे लागले.
शेअर बाजारात धमाका; 2,500 अंकांनी वधारला
भारतीय शेअर बाजारात सोमवारी ’क्लोजिंग बेल’च्या वेळी जोरदार तेजी पाहायला मिळाली. प्रमुख शेअर्समधील खरेदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे बाजाराला मोठे बळ मिळाले. गेल्या अवघ्या दोन सत्रांमध्ये सेन्सेक्स तब्बल 2,500 अंकांनी, तर निफ्टी 3 टक्क्यांनी वधारला आहे. दुसरीकडे, परकीय चलनांच्या बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण झाली असून रुपया आता प्रति डॉलर 95 च्या पातळीच्या खाली घसरला आहे, ज्याचा थेट परिणाम बाजारातील काही क्षेत्रांवर दिसून येत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
या करारामुळे केवळ जागतिक राजकारणातच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेतही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. या शांतता कराराचा सर्वाधिक आणि थेट फायदा भारताच्या इंधन आणि ऊर्जा क्षेत्राला होणार आहे. मात्र, कराराच्या घोषणेनंतर हेच दर आता 80 डॉलरच्या खाली घसरू लागले आहेत. सागरी वाहतूक पूर्ववत होत असल्याचा मोठा पुरावा म्हणजे, तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ’दिशा’ हे भारतीय एलएनजी मालवाहू जहाज या संघर्षाच्या क्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडणारे पहिले जहाज ठरले आहे.
The Strait of Hormuz will open up.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…