राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

‘डीलिमिटेशन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार

♦ डीलीमिटेशन, महिला आरक्षणाशी जोडलेल्या बहुचर्चित घटनादुरुस्ती विधेयकाला नवा आकार

♦ सर्व राज्यांच्या लोकसभेतील जागा समान प्रमाणात 50% ने वाढवण्यात येणार

♦ प्रत्येक राज्याचा लोकसभेतील हिस्सा 2051 पर्यंत गोठवण्यात येणार

नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्र सरकारने सीमांकन आणि महिला आरक्षणाशी जोडलेल्या बहुचर्चित घटनादुरुस्ती विधेयकाला नवा आकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 27) ‘सेवा तीर्थ’ येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यानुसार सर्व राज्यांच्या लोकसभेतील जागा समान प्रमाणात 50% ने वाढवण्यात येणार आहेत, पण राज्यांमधील सध्याचे प्रमाण म्हणजे प्रत्येक राज्याचा लोकसभेतील हिस्सा 2051 पर्यंत गोठवण्यात येणार आहे. लोकसभेच्या जागांची सध्याची संख्या 543 आहे, ती वाढून सुमारे 816 होईल, तर घटनेतील कमाल मर्यादा 550 वरून 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे.
हा बदल दक्षिणेतील राज्यांच्या भीतीवर उत्तर म्हणून आणला आहे. आधीचा प्रस्ताव लोकसंख्येवर आधारित असता, तर लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांचे प्रमाण घटले असते. आता प्रत्येक राज्याला 50% वाढ मिळणार असल्याने कोणत्याही राज्याचा हिस्सा कमी होणार नाही, असा सरकारचा दावा आहे. उदा. उत्तर प्रदेश 80 वरून 120, तर महाराष्ट्र 48 वरून 72 जागांवर जाईल. हे विधेयक महिला आरक्षणाशी जोडलेले आहे – म्हणजे वाढलेल्या जागांमध्येच लोकसभेत आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू होईल, अशी सरकारची योजना आहे. मात्र, विधेयकाचा अंतिम मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नाही.
पार्श्वभूमी आणि पुढील गणित
हेच विधेयक एप्रिल 2026 मध्ये लोकसभेत पराभूत झाले होते. तेव्हा घटनादुरुस्तीसाठी लागणार्‍या 352 मतांपैकी सरकारला फक्त 298 मते मिळाली होती. म्हणूनच सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभा 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला, तर राज्यसभा 2 आणि 3 डिसेंबरला बसणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, विधेयक 30 नोव्हेंबरलाच लोकसभेत मांडले जाईल. घटनादुरुस्तीसाठी दोन्ही सभागृहात दोन-तृतीयांश बहुमत लागते, जे सत्ताधारी एनडीएकडे एकट्याकडे नाही.
त्यामुळे भाजपने विरोधी पक्षांमधील प्रादेशिक पक्षांशी संपर्क वाढवला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लोकसभेत 8 खासदार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयक आधी येऊ द्या, वाचून ठरवू. महिला आरक्षण, जीएसटीसारखे कायदे एकमताने झाले, तसे हेही होऊ शकते असे सूचित केले आहे. त्याचबरोबर द्रमुकनेही तामिळनाडूचा सुमारे 7.2% हिस्सा कायम राहिल्यास विचार करू, अशी भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि काही समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडूनही सकारात्मक संकेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही सर्व चर्चा अद्याप अधिकृत पाठिंबा नाही, तर ‘मसुदा पाहून निर्णय’ या टप्प्यावर आहे.

Union Cabinet approves ‘delimitation’

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लोणवाडे शिवारातील गोडावूनला भीषण आग

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…

8 minutes ago

गंगापूर धरण समूहातून शेतीसाठी चार आवर्तने

पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…

51 minutes ago

अग्निशमनच्या उपकरण खरेदी निविदेत घोळ

विशिष्ट मक्तेदाराला लाभ देण्यासाठीचे प्रयत्न? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने 34 प्रकारची अत्याधुनिक…

59 minutes ago

1,551 कोटींच्या आराखड्यातील निम्मा निधी जुन्या कामांवर खर्च

विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक नाशिक : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी…

1 hour ago

केदारांचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांच्या खिशात!

गिरीश महाजनांनी संभ्रमाचा पडदा दूर केला नाशिक : प्रतिनिधी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पक्षाचा प्रोटोकॉल मोडल्याने…

1 hour ago

बोगनवेल

पावसाळा सुरू झाला म्हणून जरा बागेत नवीन झाडं लावण्यासाठी नर्सरीत रोपं आणण्यासाठी गेले... नर्सरीत छान…

22 hours ago