विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; आज अंत्यसंस्कार
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांत धडाडीचे नेते आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे ’दादा’ व्यक्तिमत्त्व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28 जानेवारी) बारामतीत विमान अपघातात निधन झाले. अजित पवार 66 वर्षांचे होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला एका खासगी विमानाने प्रवास करत होते. लँडिंग करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विमान कोसळून झालेल्या या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील पाचही जणांना आपले प्राण गमावले लागले. विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचे नियंत्रण सुटले. पाहता पाहता विमान जमिनीवर आदळले आणि त्याला भीषण आग लागली.
हा अपघात इतका भयानक होता की, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसोबत त्यांचे सहकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान बॉम्बार्डियर लिअरजेट 45 मॉडेलचे होते. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्युमुखी पडले. प्रशासनावर पकड असलेला धुरंधर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधकडपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे, तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्त्वाने कोरल्या गेल्या आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आज (दि. 29) सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवारी संध्याकाळपासून त्यांचे पार्थिव विद्यानगरी चौकातील विद्या प्रतिष्ठान येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता आले. उद्या (दि. 29) सकाळी नऊ वाजता गदिमा सभागृहापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. विद्या प्रतिष्ठान चौकापासून भिगवण रोड सेवा रस्त्यावरून ही अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर सकाळी 11 च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून सांत्वन केले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह देशातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. राज्यभरातूनर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये पोहोचणार आहेत.
प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, विमानाचा स्फोट इतका जोरदार होता की, कोणीही काहीही करू शकले नाही. बचाव पथक आले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुद्धा आम्हाला पाणी आणण्यास सांगितले. आम्ही बादल्यांमध्ये पाणी आणले. अजित पवार यांचे शरीर एका बाजूला पडले होते. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आम्ही एक नवीन ब्लँकेट दिले आणि त्यांचे शरीर त्यात गुंडाळले. सुमारे अर्धा तास आग सुरु होती. चष्मा आणि घड्याळावरून आम्हाला ते अजित दादा असल्याचे ओळखता आले.
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाचा बारामतीत अपघात झाला. अजित पवार कंपनीच्या प्रायव्हेट जेटचा वापर करत होते. या विमानाच्या हवाई प्रवासाचा फ्लाईट रडारचा फोटो समोर आला आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या विमानाने बारामती विमानतळावरील रनवेवर उतरण्यापूर्वी एक फेरी मारली. तज्ज्ञांच्या मते फ्लाईट रडारवर हिरव्या रंगाची रेषा दिसून येते म्हणजे विमान थेट रनवेवर उतरण्याऐवजी एक फेरी मारुन दुसर्यांदा रनवे सोबत अलाईन करण्याचा प्रयत्न करत होते. याचा अर्थ पायलटने विमानाचे लँडिंग पहिल्यांदा रद्द केले होते. त्यानंतर विमान दुसर्यांदा रनवेवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विमान धावपट्टीवरून घसरुन अपघात
अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. त्यांच्या आज चार ते पाच सभा होणार होत्या. ते सकाळी 8:10 वाजता मुंबईहून निघाले. महाराष्ट्र विमान वाहतूक विभागाच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने पायलटने विमान अधिक उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला आणि त्यात आग लागली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाने लँडिंग दरम्यान कोणताही आपत्कालीन सिग्नल दिला नाही. त्याने ’मेडे’ कॉलही केला नाही.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…