भारतीय पंचांग तिथीनुसार 26 जानेवारी हा स्वर्गीय द्रष्टे ज्ञानयोगी बाळासाहेब वाघ यांचा पुण्यस्मरण दिवस आहे. भावसुमनांनी श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस तारखांनी मोजायचा नसतो. देहरूपी हयात नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत त्यांचे मौलिक विचार, अभूतपूर्व कर्तृत्व, समाजावरचे ऋण, केलेली साधना आणि विपरीत परिस्थितीवर केलेली मात यावरून खर्या अर्थाने मोजदाद करावयाची असते. त्यांनी मागे ठेवलेल्या यशाची फक्त जपणूक करावयाची नसून, त्यांच्या कामाचा आदर्श समोर ठेवून त्यात उज्ज्वलतेची भर घालावयाची असते. त्यांच्या चिंतनशील आयुष्याचा जमाखर्चाचा दिवस म्हणजेच हा स्मृतिदिन म्हणून साजरा करावयाचा असतो.
रानवड (निफाड) आणि नाशिक परिसरातील शेतकरी आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर पडला पाहिजे, अशी आस असलेले आणि त्यासाठी व्याकूळ झालेले कर्मयोगी बाळासाहेब उर्फ भाऊ घरंदाज शेतकरी कुटुंबात जन्मलेले, हे मुळात हाडाचे शेतकरी होते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी व आर्थिक उन्नतीसाठी त्यांचा जीव सतत तळमळत होता. ग्रामीण भागातील शेतकर्यांची व शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान सेवा निर्मिती हेच आयुष्याचे उत्तरायन ब्रीद मानले, ध्येय मानले आणि त्यासाठी ते शेवटपर्यंत चंदनासम झिजत राहिले. अगदी मृत्यूपूर्व चार महिने अगोदर नवीन कृषी-शिक्षण धोरणामध्ये योगदान दिले. महाराष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारणारा शेतकरी त्यांचे हे अमोल ऋण कसा विसरू शकेल?
कर्मवीर काकासाहेबांच्या शिस्तप्रिय शिकवणीखाली वाढलेल्या बाळासाहेबांचा कल शालेय व तद्नंतरचे फर्ग्युसन कॉलेजच्या शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी कृषी शाखेकडे जातो. याचाच अर्थ आर्थिक स्थिती उत्तम असल्यानंतरसुद्धा त्यांचा ओढा शेतीकडेच होता. इतकेच काय पण कृषी महाविद्यालयातून 1958 मध्ये बी. एस्सी (कृषी ऑनर्स) पदवी घेतल्यावरसुद्धा कृषी खात्यात अर्ज न करूनसुद्धा मिळालेल्या नोकरीवर लाथ मारत रानवडला चुलत्यांबरोबर एक वर्ष स्वतः शेतात राबण्याचे ठरविले. मूळचा अनुभवाचा आणि आरोग्याचा पाया पक्का असेल तरच भविष्यातील स्वप्नांची परिपूर्तता करता येते, याची त्यांनी पक्की गाठ बांधली असली पाहिजे तसेच त्या काळच्या पारंपरिक शेतीमधून भविष्याची वाटचाल सुदृढ होणार नाही, या भावनेतून आणि नाशिकचे थोर नेते स्व. भाऊसाहेब हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला धडा खासगी साखर कारखान्यात नोकरीच्या स्वरूपात गिरविला. त्या काळी 1960 पर्यंत असलेले खासगी साखर कारखाने, शेतकर्यांच्या कष्टाचे चीज त्यांना कंगाल करून देत असत हे लक्षात येताच शेतकरीप्रेमी या गृहस्थाने आपली नोकरी सहकारी कारखान्याकडे वळविली. बदल हा स्थायीभाव समजून त्यांनी स्वकष्टाने सहकारातील सर्वोच्च पद स्व. शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी सहकार साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून भूषविले. साखर कारखान्याचे कृषी अधिकारी (खासगी व सहकारी) आणि कार्यकारी संचालक अशी अनुभवाची शिडी तयार झाली. कृषी-विज्ञानाचा भक्कम पाया आणि आसेतू-हिमालय कार्यानुभव त्यांना पुढे साखर कारखाना अध्यक्षपदावर (निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाना नाशिक) येथे विराजमान होण्याचे सौभाग्य मिळाले. काळ्या आईची व शेतकर्यांची इमाने-इतबारे केलेली सेवा हेही सत्कर्म आहे. मी या मातीतला म्हणून या मातीशी, जलाशी इमान असणे ही राष्ट्रीय उपासनाच आहे, अशी सद्भावना त्यांनी नेहमीच दुरी बाळगली. मला स्वतःलाही त्याचा अनुभव झाला.
मानवाची प्रगती ही काही मोजक्या आणि असामान्य लोकोत्तर व्यक्तीच्या कर्तबगारीवर होत असते. नाशिक जिल्हा याबाबत आघाडीवर होता आणि आजही आहे हे जरी खरे असले तरी आदरणीय स्व. बाळासाहेब उर्फ भाऊंसारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे व अभियांत्रिकी कृषी व कृषी संलग्न शाखांच्या ज्ञानगंगा प्रस्थापनेमध्ये अद्वितीय वाटा आहे.
शेती आणि शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणत असताना तो बदल शाश्वत स्वरूपात कसा राहील, या विचाराअंती घेरल्यानंतर आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण, जलसंपत्ती उपयोगिता तंत्रज्ञान याचा आयुष्यभर पाठपुरावा केला. भाऊंनी निसर्गावर भरभरून प्रेम केले. निसर्ग जसा असेल तसे आपण राहावयास शिकले पाहिजे, असे ते आवर्जून सांगत असत. त्यांनी आपल्या सर्व शिक्षण संस्था पर्यावरणाला पोषक होतील आणि त्याची कदापिही हानी होणार नाही याच पद्धतीने उभारल्या. इतकेच नव्हे तर मेहनत व कल्पकता वापरून त्यांनी के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी अधिपत्याखाली पंचवटी, नाशिक परिसरात कर्मवीरांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. निसर्ग उभा केला आहे. भाऊंची जिज्ञासा ही उत्कट आणि समाजोन्नतीसाठी धडपडणारी होती. ती सतत मधमाशीसारखी ज्ञानाचे अमृतकण गोळा करीत होती. भाऊंनी त्यांच्या सहवासात येणार्या प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्ये, ताकद व मर्यादा आणि आवडीनिवडी समजावून घेऊन त्यांच्यातल्या कलागुणांना कसा वाव मिळेल, याकडे सातत्याने व नियमितपणे लक्ष दिले. नवीन पिढी आपल्याला निर्मितीक्षम बनवायची आहे, त्यासाठी मेहनतीचा वाटा मोठा असावा लागतो म्हणून भाऊंनी मेहनतीलाच परमेश्वर मानून तरुणांना प्रचंड प्रोत्साहन दिले.
ज्ञान मिळविणे ही एक साधना आहे. मिळविलेले ज्ञान सर्वांना वाटणे हे समत्व आहे, ते करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. ज्ञानाशिवाय कर्म असू शकत नाही. ज्ञान व कर्म एकमेकास पूरक आहेत याची भाऊंना पूर्ण जाणीव होती. ज्ञानार्जनाची सुरुवात अगदी आपल्या घरापासून (गावापासून) केली. या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले. आज या संस्थेमार्फत बालमुक्तांगण, प्राथमिक शाळा, माध्यमिक, शाळा, वरिष्ठ महाविद्यालये, इंग्लिश मीडियम स्कूल, तंत्रनिकेतन, ललित कला महाविद्यालये आणि अभियांत्रिकी महाविद्यालये अशा एकूण 30 संस्था चालविल्या जातात. त्यामधून सुमारे 21 हजार विद्यार्थी आणि 1800 शिक्षक व शिक्षकेतर संस्थेत कार्यरत आहेत.
आपला देश कृषिप्रधान देश आहे, पण कृषी शिक्षणाची पहाट उशिरा उगवली. महाराष्ट्रात पहिले खासगी विनाअनुदानीत कृषी महाविद्यालय कोकणात 2002 मध्ये अनेकांच्या प्रयत्नातून स्थापन झाले. त्यामध्ये द्रष्टे ज्ञानयोगी स्व. भाऊंचा फार मोठा सहभाग आणि त्याग होता. कृषिज्ञानाची ज्योत बघता बघता के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक पंचवटी परिसरात विस्तारीत झाली. कृषी व संलग्न शाखांत सहा महाविद्यालये सर्व परिपूर्ण बाबींसहित विद्यार्थीप्रिय म्हणून कार्यरत झाली. नाशिक जिल्हा कृषिक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान महाराष्ट्रात अव्वल असल्यामुळे या महाविद्यालयांना ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषितंत्र संस्थांमध्ये अनुभवाची दिशा मिळत आहे. या महाविद्यालयातून बाहेर पडलेले पदवीधर, युवक, ज्ञान, अनुभव आणि कौशल्यावर भावी जीवनाची वाटचाल करत आहेत.
भाऊसाहेब हिरे आणि कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या साखर कारखान्याचे ते पहिले मॅनेजिंग डायरेक्टर झाले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून सुरू झालेला खडतर प्रवास करत कृषी अधिकारी, सचिव पदे भूषविताना शेतकर्यांना आर्थिक सुस्थितीत आणण्याच्या टोकावर स्थिरावला. त्याही पुढे क. का. वाघ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर गरुडझेप घेतली. सत्तेची पायरी पादाक्रांत करीत असताना शेतकर्यांच्या आर्थिक सुबत्तेविषयी आस्था मात्र कायम ठेवली. सहकार, साखर उद्योग, शाश्वत शेती आणि कृषीसह ज्ञान लालसा ही चार सूत्री कार्यक्रम अमलात आणला. रानवड परिसरातील शेतीचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढाकार घेऊन सहकारी तत्त्वावर उपसा सिंचन योजना राबविल्या आणि यशस्वीरीत्या चालविल्या. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या शासकीय धोरणानुसार सामाजिक चळवळ उभारून 250 साखळी बंधारे निर्माण करून कर्मवीर बंधारे नामकरण करून शेतकर्यांच्या सहकार्याचा आदर्श निर्माण केला. या बंधार्यांमुळे निफाड परिसर सुजलाम् सुफलाम् होण्यास खूप मदत झाली. आजच्या कृषितंत्रज्ञान विकासाचा पाणी हा आत्मा झाला आहे. ओझरखेड प्रकल्पाचा 20 कि.मी. कालवा लाभक्षेत्रात पुरेपूर सिंचन होऊनही प्रकल्पात पाणी शिल्लक राहात होते. नाशिक तालुक्यातील काही परिसर त्यापासून वंचित राहत होता. कनिष्ठ बंधू मा. खासदार प्रतापराव वाघ यांच्या मदतीने त्यांनी ओझरखेड कालव्याची लांबी 20 कि.मी. पासून वाढवून 35 कि.मी.पर्यंत पोहोचविली. इतकेच काय पण त्यांच्याच सहकार्याने त्या परिसरात चौदा-पंधरा उपसा सिंचन योजनाही राबविल्या. कृषी विकासाच्या विविध क्षेत्रांत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यास प्राधान्य दिले. साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि लाभधारक शेतकर्यांच्या माध्यमातून रानवड, रेडगाव, निमगाव आणि नांदूरखुर्द उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करून हजारो एकर जमीन बागायतीखाली आणण्याचे महत्कार्य त्यांच्या हातून पार पाडले.
नाशिक परिसरात कर्तृत्वाचा शुभारंभ केला असला तरी शैक्षणिक आणि जलसंधारण, जलव्यवस्थापन माध्यमातून त्यांनी आपली प्रतिमा राज्यपातळीवर पोहोचविली. त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची दखल जीवन-गौरव पुरस्काराने कृषी महाविद्यालय, राहुरी विद्यापीठांतर्गत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (2009) अंतर्गत त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरचा मानाचा मुकुट म्हणून ओळखले जाणारे उपाध्यक्षपद हे 2003 पासून त्यांच्याकडे राहिले. चारही कृषी विद्यापीठांतील विनाअनुदानित कृषी व संलग्न 152 महाविद्यालयांच्या स्थापनेपासून शेवटपर्यंत अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. यातच त्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीचा जाणतेपणा स्पष्ट दिसून येतो. त्यांच्या आयुष्यातील
सर्वोत्तम कळस म्हणजे जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. पद्मश्री माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राज्याच्या दुसर्या सिंचन आयोगाचे सदस्य म्हणून झालेल्या कार्याचा गौरव अभिमानास्पद आहे. आज त्यांचा पुण्यस्मरण दिवस. त्यांचे मौलिक विचार, कर्तृत्व साधना आणि त्यांनी भविष्यकालीन करावयाच्या कार्याच्या दिशा यांचे स्मरण करून साजरा
करावयाचा आहे.
The visionary and enlightened yogi: Late Balasaheb Wagh
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…