अग्रलेख

‘टी-20’ विश्वचषकाचे राजकारण

दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, आखातातील संयुक्त अरब अमिरात, ओमान अशा अनेक देशांतही वाढलेली आहे. भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. अगदी सुरुवातीला या खेळात पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांना महत्त्व होते. पण, ते सामने संथगतीने खेळले जायचे. विश्वचषक स्पर्धा मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांनी खेळविली जायची. त्यानंतर, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांनी क्रिकेटला वेगवान बनविले. एकदिवसीय सामन्यांनंतर भारतात 20 मर्यादित षटकांचे (टी-20) सामने सुरू झाले. वेगाने धावा जमवण्यासाठी फलंदाजांना फटकेबाजी करणे भाग पडले. त्यामुळे या खेळाला आणखी वेग आला. भारतात आयपीएल स्पर्धा लोकप्रिय झाली ती केवळ फटकेबाज फलंदाजांमुळे. जागतिक स्तरावर एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना टी-20 विश्वचषक स्पर्धा भरविली जाऊ लागली. पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये भरविण्यात आली होती. दहावी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान होणार असून, एकूण 20 संघ सहभागी आहेत. एकूण 55 सामने खेळले जातील. भारतात मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद येथील मैदानांवर सामने होणार असून, वापरले जातील, तर श्रीलंकेत कोलंबो (आर. प्रेमदासा, सिंहलीज स्पोर्ट्स क्लब) आणि कँडी (पल्लेकेले) येथे सामने होतील. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. पाकिस्तान अंतिम फेरीत गेल्यास सामना कोलंबोमध्ये होईल. स्पर्धेतील 20 संघांची विभागणी चार गटांत करण्यात आली असून, प्रत्येक गटात पाच संघ आहेत. प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम संघ सुपर एटमध्ये (उत्कृष्ट आठ) प्रवेश करतील. त्यानंतर 4-4 संघांचे दोन गट केले जातील. सुपर एटमधील संघांचे दोन गट केले जातील. एका गटात चार संघ असतील. एका गटातून दोन सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य सामने 4 व 5 मार्च रोजी होतील. तर अंतिम सामना 8 मार्च रोजी होईल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच राजकारण सुरू झाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याने भारतात बांगलादेशी लोकांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. भारतात आपल्या खेळाडूंच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, हे लक्षात घेऊन बांगलादेश सरकारने त्यांच्या संघाविरुद्धचे सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी केली होती. ती नाकारण्यात आल्याने बांगलादेशने
स्पर्धेतून अंग काढून घेतले. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पाकिस्ताननेही भारताविरुद्धच्या श्रीलंकेतील सामन्यावर बहिष्कार घातला आहे. दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात सामना होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या स्पर्धेला वादविवादाचे आणि राजकारणाचे गालबोट लागले. त्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. या स्पर्धेमध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जो सामना होणार होता, त्या सामन्यावर बहिष्कार घालून पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानावर राजकारण सुरू केले. भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात जाऊन क्रिकेट खेळत नाहीत. त्रयस्थ देशांत मोठ्या स्पर्धांत हे देश आमनेसामने येतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा म्हणून ही स्पर्धा संयुक्तपणे भरवण्यात आली. नाहीतर ही स्पर्धा फक्त भारताच्या मैदानांवरच खेळवली जाणार होती. पाकिस्तानची सोय व्हावी म्हणून श्रीलंकेला सहयजमान करण्यात आले. असे असतानासुद्धा बांगलादेशला पाठिंबा देताना पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानात राजकारणाचा आखाडा भरवला. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील लिलावामध्ये एका बांगलादेशी खेळाडूला सहभागी करून घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विरोध दर्शवला होता. या खेळाडूला त्या लिलावातून आणि आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर किंवा प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने आम्ही भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळायला जाणार नाही, अशी घोषणा केली. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही भारताचा दौरा करणार नाही, आमचे सामने इतरत्र नियोजित करावेत, अशी बांगलादेशची मागणी होती. पण ऐनवेळी ते शक्य नसल्याने आयसीसीने बांगलादेशला या स्पर्धेतूनच बाजूला काढले आणि त्यांच्या जागी दुसर्‍या देशाला संधी दिली. खरेतर हा विषय येथेच संपत असताना पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देत आम्हीसुद्धा भारताविरुद्धचा 15 फेब्रुवारीचा सामना खेळणार नाही, अशी घोषणा केली. दरम्यान, 15 फेब्रुवारीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. त्यांच्या निर्णयाचा पाकिस्तानलाच अनेक अर्थाने फटका बसणार आहे. एक तर त्यांना दोन गुण गमवावे लागणार आहेतच. आयसीसी आणि प्रायोजकांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडही लावला जाऊ शकतो. एखादा संघ न पटणार्‍या एखाद्या कारणासाठी या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर तो करार भंग मानला जातो आणि सर्व प्रायोजक अशा संघाविरोधात आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा सामना असतो. जाहिरातदार ब्रॉडकास्ट कंपन्या सर्वांसाठीच हा सामना म्हणजे कमाईची मोठी संधी असते. पण, पाकिस्तानने ऐनवेळी असा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाला मुकावे लागणार असल्याने त्याची भरपाई ते पाकिस्तानकडूनच वसूल करणार हे उघड आहे. याव्यतिरिक्त आयसीसीचा सदस्य असलेल्या पाकिस्तानने शिस्तभंग केल्याचे कारण देऊन आयसीसीकडूनसुद्धा पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले जाऊ शकतात, ज्यामध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यावर बंदी असे काही कठोर उपाय असू शकतात. पाकिस्तानला या सर्व परिस्थितीची कल्पना नाही असे नाही. पण केवळ लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादात पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धचा सामना खेळू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. पूर्वीच्या काही विश्वचषक स्पर्धांमध्ये जरी अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्या तरी एखाद्या देशाने दुसर्‍या देशाविरुद्ध सामना न खेळण्यामागे एखादे संयुक्तिक किंवा योग्य कारण असायचे. पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ज्ञसुद्धा पाकिस्तानचा हा निर्णय त्यांना अनेक वर्षे मागे घेऊन जाणारा ठरेल, असे सांगत आहेत. पण पाकिस्तानच्या विचित्र राजकारणावर त्याचा कोणता फरक पडेल, असे सध्या तरी दिसत नाही. ज्याप्रकारे भारताने आशियाई क्रिकेट चषक स्पर्धा जिंकूनसुद्धा अद्याप तो चषक पाकिस्तानने स्वतःच्याच ताब्यात ठेवला आहे, या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तान चर्चेत राहणार आहे. पाकिस्तानने या निर्णयाने विजेतेपद मिळवण्याची शक्यता तर कमी केली आहेच, शिवाय भविष्यातील क्रिकेट विकासालाही खो घातला आहे. याव्यतिरिक्त आर्थिक नुकसानभरपाईच्या निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कंबरडेही मोडले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेटचे आणि पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांचे सल्लागार जर चाणाक्ष असतील तर अजूनही या स्पर्धेत भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने मागे घ्यावा, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानने समजूतदारपणा दाखविला तर भारत-पाकिस्तान सामना होईल.

Politics of the T20 World Cup

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

46 seconds ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

8 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

13 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

17 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

22 minutes ago

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…

27 minutes ago