कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलचे शटर वाकवून ऐवज लंपास
सिडको : प्रतिनिधी
वडाळा-पाथर्डी रोडलगतच्या परिसरात सलग दुसर्या आठवड्यात दुकानफोडीच्या घटना सुरूच असून, रविवारी (दि. 9) मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलचे शटर कशाच्या तरी सहाय्याने उचकावून दुकानातील रोख रकमेसह किमती साहित्य असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अनिल बागड (रा. विजयनगर, सिडको) यांचे कलानगर चौकात सुदर्शन मेडिकल नावाचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 45 हजार रुपये रोख, तसेच कॅडबरी, दाढी करण्याचे साहित्य, पेन क्लीनर सिरपच्या दोन बाटल्या, सॅनिटरी पॅड आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर असा किमती ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने डीव्हीआरही सोबत नेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
दुकानफोडीच्या मालिकेने पोलिसांसमोर आव्हान
वडाळा-पाथर्डी रोडलगत गेल्या आठवड्यात पतंजली स्टोअर, माऊली ज्वेलर्स, संसार शोभा स्टील आणि स्वामी कलेक्शन या दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर आता मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलमध्येही घरफोडी झाल्याने दुकानफोडीच्या मालिकेने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर बाबींच्या आधारे सखोल तपास करण्यात येत आहे.