पुष्पक इंडस्ट्रीजविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाटा येथील पिनॅकल ऑक्सिजन कंपनीच्या आवारातून सहा ऑक्सिजन सिलिंडरच्या टाक्या चोरी करून त्यावर स्वतःच्या कंपनीचे स्टिकर लावून व्यवसायासाठी वापरल्याप्रकरणी विल्होळी येथील पुष्पक इंडस्ट्रीज कंपनीच्या मालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत अंबड एमआयडीसी परिसरात घडली होती.
अंबड औद्योगिक वसाहतीत माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या मालकीच्या पिनॅकल ऑक्सिजन कंपनीच्या आवारात 200 लिटर क्षमतेच्या सहा ऑक्सिजन सिलिंडरच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या टाक्यांची एकूण किंमत सुमारे 11 लाख 50 हजार 200 रुपये आहे. या टाक्या विल्होळी येथील पुष्पक इंडस्ट्रीज कंपनीचे चालक व मालक यांनी चोरी करून त्यावर आपल्या कंपनीचे स्टिकर लावून वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जाधव व त्यांच्या वैयक्तिक यंत्रणेने या टाक्यांचा शोध सुरू केला असता, नेक्स्ट स्टेप मल्टी पार्किंग कंपनीत तीन, धनराज स्विच गिअरमध्ये एक तर धाडीवाल हॉस्पिटलमध्ये दोन, अशा सहा टाक्या आढळल्या. नेक्स्ट स्टेप कंपनीत चारचाकी वाहनातून वाहतूक होत असलेल्या टाक्यांची खात्री करून संबंधित वाहनचालकासह टाक्या पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या.
ऑक्सिजन टाक्यांवर असलेले चेसीस नंबर, उत्पादक कंपनीचे नाव तसेच मूळ मालकाकडे असलेली अधिकृत कागदपत्रे यांच्या आधारे ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत
आहेत.
Theft of Pinnacle’s oxygen cylinder