नाशिक

वडझिरे, घोरवड व वावीत चोरट्यांचा धुमाकूळ

लाखोंचा ऐवज लंपास; वडझिरेत 8.12 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील वडझिरे, घोरवड आणि वावी या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोड्यांच्या घटना घडवल्या आहेत. यामध्ये वडझिरे येथे कुटुंबीय झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 लाख 12 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. घोरवड आणि वावी येथेही बंद घरांमध्ये घरफोडीच्या घटना घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडझिरे येथील निखिल लक्ष्मण नागरे कुटुंबासह शेतातील घरात वास्तव्यास आहेत. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचे आजोबा लघुशंकेसाठी उठले होते. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पडताच चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. आजोबांनी संशय आल्याने घरातील सदस्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
दरम्यान, चोरट्यांनी घरातील कपाटे उघडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. काही वेळाने एका महिलेला जाग आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील युवकांनीही परिसरात शोधमोहीम राबविली. सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने वडझिरे-जायगाव रस्त्यावरील घाटातील महादेव मंदिरापर्यंत माग काढल्याचे सांगण्यात आले.
या चोरीत तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहे हार, प्रत्येकी चार तोळे वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, दोन तोळे वजनाचे सोन्याचे पोत, दोन तोळे वजनाचा राणीहार, सोन्याची अंगठी, नथ, नथणी तसेच चांदीच्या वस्तू असा एकूण 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. निखिल नागरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात सलग घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शेतवस्त्या आणि गावांच्या बाहेरील भागात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि घरफोडीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वडझिरे, घोरवड आणि वावी येथील घटनांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीच्या प्रभावीतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घोरवडमध्ये बंद घर फोडून 96 हजारांचा ऐवज चोरीला

घोरवड येथील गणपत भागुजी हगवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 96 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी कपाटातील लॉकर फोडून सोन्याची चैन, अंगठ्या, कानातील दागिने, चांदीच्या वस्तू आणि 10 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वावीत दोन घरफोड्या

वावी येथेही चोरट्यांनी दोन ठिकाणी हात साफ केला. स्वाती कर्पे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा सुमारे 48 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. तर अमर (शंकर) राजेभोसले यांच्या घरात घुसून साहित्य अस्ताव्यस्त करत नुकसान करण्यात आले. कर्पे यांच्या घरफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनांमुळे वावी परिसरातही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Thieves on the rampage in Vadjire, Ghorvad, and Vavi.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago