सोमवारपासून धडक मोहीम
नाशिक : प्रतिनिधी
शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलेला दोन दिवसांचा शटडाउन प्रशासनाच्या अंगलट आला असून, चौथ्या दिवशीही शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, आता महापालिकेने कनेक्शनधारकांनी नळाला तोट्या बसविल्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो. याशिवाय काही ठिकाणी नळजोडणीच्या पाइपलाच थेट वीजपंप लावल्याने त्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. दरम्यान, अशा नळजोडणीधारकांवर येत्या सोमवार (दि.13) पासून महापालिका धडक मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई करणार आहे.
पाणीपुरवठा विभागाने बुधवारपासून (दि.8) पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने धडक मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या वतीने पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकार्यांच्या अधिपत्याखाली दि. 13 एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई मनपाच्या वतीने करण्यात येईल. यासाठी महापालिकेतर्फे आयुक्तांकडील आदेशान्वये सोमवारपासून विशेष मोहीम विभागीय अधिकार्यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येईल. मोहिमेच्या तपासणीत ज्या ठिकाणी नळाला तोटी नसेल तेथे तोटी बसविण्यात येईल व जोडणीधारकांकडून शंभर रुपये दंड वसूल केला जाईल. नळजोडणीत जलमापक नसल्यास किंवा ते नादुरुस्त, बंद आढळल्यास नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन पाणी बिल आकारणी करण्यात येईल. वीजपंप नळजोडणी केलेली आढळल्यास वीजपंप कायमस्वरूपी जप्त करून पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. पाण्याचा अपव्यय केल्यास व पाणी वाया घालविल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येईल.
नळजोडणीधारकावर दंडात्मक कार्यवाहीसाठी मीटर रीडर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी केले आहे.
प्रत्येक विभागात दोन पोलिसांची सुरक्षा
ही मोहीम राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित विभागाच्या उपअभियंत्यांनी त्यांच्या अखत्यारितील एक कनिष्ठ अभियंता, मिस्त्री, मुकादम यांची प्रभागनिहाय नेमणूक करण्यात येणार आहे. एक फिटर व पाच प्लंबरची नेमणूक नळांना तोट्या बसविण्यासाठी करण्यात येणार आहे. या मोहिमेत कार्यरत कर्मचार्यांना पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षक यांचा बंदोबस्त असेल. प्रत्येक विभागाला दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वीजपंप जप्तीसाठी विद्युत विभागामार्फत एका इलेक्ट्रिशियनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Those who install electric pumps for plumbing are not happy.