नऊ गुन्हे दाखल, सहा जणांना अटक
सिडको : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात आणि सातपूरच्या पत्रकार रवींद्र एरंडे प्रकरणामुळे नाशिक गाजत असतानाच आता नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींवर अत्याचार आणि जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असूून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या कंपनीतील तरुणींना कामाच्या ठिकाणी लक्ष्य करून अत्याचार आणि जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उघडकीस आलेल्या गंभीर प्रकरणात सहा अविवाहित महिला, दोन विवाहित महिला आणि एक पुरुषाचा समावेश असून, सर्वांचा वयोगट 18 ते 25 वर्षांदरम्यान आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्वांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्य करण्यात येत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू पार्श्वभूमी असलेल्या तरुणींना मुद्दाम लक्ष्य करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये बलात्कार व विनयभंगाचा एक गुन्हा, विनयभंगाचे चार गुन्हे, धार्मिक भावना दुखावणे व विनयभंगाचे तीन गुन्हे आणि धार्मिक भावना दुखावण्याचा एक गुन्हा यांचा समावेश आहे. तपासादरम्यान काही महिला पीडितांना जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडण्यात आल्याचे समोर आले आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, हिजाब परिधान करणे, नमाज अदा करणे तसेच रोजा ठेवण्यास भाग पाडण्यात येत होते. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, एका पुरुषाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्याचे नाव बदलून त्याला विशिष्ट धार्मिक पेहरावात राहण्यास भाग पाडण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. तसेच, एका महिला कर्मचार्यांकडे बैठकीदरम्यान अनुचित पद्धतीने पाहून हसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सहा जणांना अटक ः या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसआयटी स्थापन
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी आस्थापनांना कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणात सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. महिलांनी विनयभंग किंवा अत्याचारासंदर्भात तक्रार असल्यास पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप क्रमांक 9923323311 वर संदेश पाठवावा किंवा 112 या नियंत्रण कक्ष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कर्णिक यांनी केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Sexual harassment of young women in a multinational company in Nashik