तीन द्राक्ष उत्पादकांना 31 लाखांचा फटका

बिहार, उत्तर प्रदेशातील दोन व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदवड / सोग्रस : वार्ताहर
द्राक्ष हंगामात व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा माल खरेदी करण्यात आला; मात्र माल ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबदला न देता तीन द्राक्ष उत्पादकांची 31 लाख 30 हजार 473 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार चांदवड तालुक्यात समोर आला आहे. याप्रकरणी वडनेरभैरव पोलिस ठाण्यात बिहार व उत्तर प्रदेशातील दोन व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोग्रस येथील शेतकरी संजय गांगुर्डे (52) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सज्जन शहा (रा. बेगुसराय, मेघोल, बिहार) आणि ओमप्रकाश यादव (रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
फिर्यादीनुसार, संशयित व्यापार्‍यांनी सोग्रस येथील गांगुर्डे यांच्या गट क्रमांक 403 मधील पाच एकर क्षेत्रातील द्राक्षमाल खरेदी केला.
या मालाचे वजन 222 क्विंटल 2 किलो असून, त्याची किंमत 19 लाख 20 हजार 473 रुपये होती. व्यापार्‍यांनी हा माल ताब्यात घेतल्यानंतर त्याची रक्कम शेतकर्‍याला अदा केली नाही.
याच पद्धतीने खडकओझर येथील शरद पगार यांच्याकडून सहा लाख रुपये, तर वडनेरभैरव येथील गणेश निखाडे यांच्याकडून सहा लाख 10 हजार रुपये किमतीचा द्राक्षमाल 26 मार्च 2026 रोजी खरेदी करण्यात आला.
मात्र, या दोन्ही शेतकर्‍यांनाही मालाची रक्कम देण्यात आली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तीनही शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या द्राक्षमालाची एकूण रक्कम 31 लाख 30 हजार 473 रुपये असून, पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याप्रकरणी वडनेरभैरव पोलिसांनी दोन्ही व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Three grape growers suffer a loss of ₹31 lakh.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *