कडी-कोयंडे तोडून 1.31 लाखांचा ऐवज लंपास; एकाच टोळीचा संशय
सिन्नर : प्रतिनिधी
नांदूरशिंगोटे परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत अवघ्या काही तासांत तीन घरांमध्ये घरफोड्या केल्या. रोकड, सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे एक लाख 31 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. एकाच रात्री सलग तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
नेहरू चौक परिसरातील भाऊसाहेब दत्तात्रय सोनवणे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील खोलीचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश केला. घरातील सदस्य शेजारील खोलीत झोपलेले असतानाच कपाटातून 7 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. चोरीपूर्वी घरातील इतर खोल्यांना बाहेरून कड्या लावण्यात आल्याचे आढळून आले.
मातंग वस्तीतील मुंगसे यांच्या घरात मागील दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश करत चोरट्यांनी 35 हजार रुपयांची रोकड, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे टॉप्स असा मोठा ऐवज लंपास केला. शिवाजी चौकातील आयुब नहरूद्दीन सय्यद यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी तेथेही चोरी केली. घरातील पाच हजार रुपयांची रोकड, घड्याळ, चांदीची चेन, अंगठी आणि काही नकली दागिने असा सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. गुरुवारी दुपारी शेजार्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर चोरीचा प्रकार
उघडकीस आला.
तिन्ही ठिकाणी चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याने एकाच सराईत टोळीने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान या घरफोड्या झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच नांदूर पोलीस चौकीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून नाशिक येथून श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नसून, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Three house burglaries in one night in Nandurshingote