लासलगाव:समीर पठाण
साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा व
हिंदू व मराठी सणामधील गुढीपाडवा हा पहिला सण.या दिवशी नवीन वस्त्र,साखरेचा पाकात बनवलेली माळ, लिंबाची डहाळी यांची गुढी उभारली जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे.अवकाळी पावसाने झोडपले आहे त्यात सर्व शेतिमालाचे अतोनात नुकसान झाले आहे,अशा परीस्थितीत शासन एकमेकांचे उणं धुणं काढण्यात मग्न असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणताही सकारात्मक विचार होत नसल्याने राज्य कर्त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांदा, लसूण व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे व कांदा उत्पादन घेतले जाते.मात्र मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे,गहु,कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच्या वल्गना करीत असले तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले नाही,तेव्हा मदत तर दूरच आहे.या हंगामात कांदे मातीमोल भावात विकावे लागत आहे.नैताळे येथीलच एक शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला होता.नैताळे येथील शेतकरी संजय साठे हे प्रगतशील शेतकरी असून त्यांनी बराक ओबामा यांची भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली होती.यांनी तिन चार वर्षांपूर्वी कांदे विकून मिळालेल्या अल्प रकमेची बिल्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानिऑर्डर तर कधी टोपी उपरणे पाठवून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.आज मराठी नव वर्षाच्या प्रारंभी गुढीपाडवाला त्यांनी लसूण, कांदा व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, तालुक्यात नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.त्यामुळे मी माझ्या शेतात पिकलेल्या द्राक्षे,कांदा व लसूण यांची गुढी उभारली आहे.अवकाळी पाऊस व गारांनी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी खचून न जाता आजच्या नवीन वर्षापासून खंबीरपणे उभे राहून कामाला सुरुवात करावी.राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे या उद्देशाने मी द्राक्षे,लसूण व कांद्याची गुढी उभारून संदेश दिला आहे
संजय साठे
प्रगतशील शेतकरी,नैताळे