स्वागत यात्रेत भाविकांचे शिस्तीचे प्रदर्शन
इंदिरानगर:
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक चित्ररथ सहभागी झाले होते.
हिंदू नववर्ष स्वागतासाठी जनम संस्थेच्या वतीने काढण्यात आली होती. काशी माळी मंगल कार्यालय येथून मिरवणुकीला सुरुवात झाली.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जमन संस्थानाच्या उत्तर महाराष्ट्र उप पिठाचे महानिरीक्षक प्रदीप मालानी, नाशिक जिल्हा सेवा समिती निरीक्षक संदीप खंडारे, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब चिकणे पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. भजनी मंडळी, आदिवासी पावरी नृत्य, आदिवासी टिपरी नृत्य, राम पंचायतन , संत देखावा, वाघ्या मुरळी, बाल वेशातील छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, मावळे यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. बेटी बचाव, बेटी पढावो चा संदेश देण्यासाठी स्वतंत्र चित्ररथ बनवण्यात आला होता. यात डॉक्टर, इंजिनिअर, वैमानिक, पोलीस वेशातील मुली सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी मोटर सायकल रॅली, निशानधारी, कळसधारी, तुळसधारी महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी हिरव्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेतील महिला तसेच पुरुषांनी भगवे फेटे घातले होते. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा मुख्य रथ हे विशेष आकर्षण होते. काशी माळी मंगल कार्यालय येथून द्वारका सर्कल, सारडा सर्कल, दूध बाजार, दामोदर टॉकीज जवळून मेन रोड, रविवार कारंजा, विक्टोरिया पुलावरून मालेगाव स्टँड इथून रामकुंडावर यात्रेची सांगता करण्यात आली. राम कुंडावर गंगेची आरती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची आरती करण्यात आली.
यात्रेत जिल्हा महिला अध्यक्षा संगीता वाळके, युवा अध्यक्षा अर्चना गवळी, हिंदू संग्राम सेना कर्नल संदीप कदम, जिल्हा सचिव जालिंदर थोरात, प्रसिध्दी प्रमुख हरिभाऊ हांडोरे, ज्ञानेश्वर कडलक, प्रकाश सानप, रोहित सानप, शिवा सूर्यवंशी, दीपक बारे, राहुल मोरे, सागर धात्रक, जनार्दन खाडे, विनोद घोडके, अमोल खोडे, पांडुरंग जगदाळे, योगेश शिरसाट, रंगनाथ पारधी, राहुल मौले, अमोल जेजुरकर, संतोष थोरात, हिरामण वाघ, रामदास गांगोडे, वसंत भाबड, हरीश कुलकर्णी,अशोक निवडुंगे, मंगला झनकर, जयश्री गवळे यांसह नाशिक जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते.
नववर्ष स्वागत यात्रेत श्री संप्रदायाच्या सेवेकरांची व भाविकांची शिस्त दिसून आली. यात्रा मिरवणुकीत कोठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. हिंदू संग्राम सेनेने यात महत्वाची भूमिका बजावली. यास पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा सेवा समितीने दिलेल्या नियोजनानुसार अकरा वाजता सर्व भाविक गंगेवर पोहचले. यातून वेळेचे नियोजन देखील दिसून आले.