त्र्यंबकेश्वरजवळ अंबईत पर्यटकांना मारहाण

चौघांंविरुद्ध गुन्हा दाखल; हुल्लडबाजीमुळे स्थानिक त्रस्त

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वरपासून 12 किमी अंतरावर असलेल्या अंबई येथील डोंगरावर कुटुंबासह ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांचे वाहन अडवून चालकाला दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 20) सकाळी घडला.
सिमराज संजय रणशूर (वय 37, रा. चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पर्यटकांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलरने (डीडी 01-यू 9046) आले होते. यादरम्यान संशयित विशाल रामू भुतांबरे याने मोटारसायकल (एमएच 15-केएन 5112) आडवी लावून कुरापत काढली. वाहनाने कट मारल्यामुळे मोटारसायकलचे नुकसान झाल्याचे सांगत त्याने चालकाला दमदाटी व मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या अनिल रामू भुतांबरे, शंकर सुरेश भुतांबरे आणि विशाल रामू लचके (सर्व रा. अंबई) यांनी शिवीगाळ करत दगडफेक केली आणि फिर्यादीचा टी-शर्ट फाडला. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, ग्रामीण भागात पर्यटनाच्या नावाखाली मद्यपान करून वेगाने वाहन चालवणे आणि हुल्लडबाजी करण्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व तरुण दुखावले जात असल्याचे समोर आले आहे. पर्यटनवाढीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी

या घटनेचे विविध स्तरांवर तीव्र पडसाद उमटले आहेत. निसर्ग सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांना मारहाण होण्याच्या प्रकारांमुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Tourists assaulted at Ambai near Trimbakeshwar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *