इंदिरानगर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

मागील गुन्ह्यात नाव सांगितल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

सिडको : प्रतिनिधी
मागील एका गुन्ह्यात आरोपीचे नाव पोलिसांना सांगितल्याच्या रागातून तरुणाला धमकावून जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. यावेळी तरुणाच्या डोक्यात हत्याराने मारून त्याला जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुभम सुभाष कनोजिया (19, रा. चव्हाण टेकडी, कलानगर, इंदिरानगर, नाशिक) याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्मय दीपक कोपरे, तेजस दीपक कोपरे, दीपक कोपरे, मयंक सैंदाणे, तेजस चौरे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलानगर सिग्नलजवळील कोटक महिंद्रा बँकेजवळ ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीररीत्या जमाव जमवला. मागील एका गुन्ह्यात तन्मय कोपरे याचे नाव पोलिसांना सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. या कारणातून त्यांनी फिर्यादीला धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी शुभम कनोजिया याला जबरदस्तीने वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपी तन्मय कोपरे याने काहीतरी हत्याराने शुभम याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलिसांकडून सुरू आहे.

Case registered against seven individuals at Indiranagar Police Station.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *