गणेशोत्सवासाठी पंचवटीत चार दिवस वाहतुकीत बदल

21 ते 24 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी 5 ते मध्यरात्रीपर्यंत प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी

सिडको : प्रतिनिधी
गणेशोत्सवातील आरास आणि देखावे पाहण्यासाठी पंचवटी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचवटीतील मालविय चौक, गजानन चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी नाका आदी परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 5 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात आरास आणि देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने वाहनांसह बाहेर पडतात. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गर्दीचे ठिकाण टाळण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो गर्दीचे मार्ग टाळून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हे निर्बंध 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 5 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत किंवा गणपती आरास बंद होईपर्यंत लागू
राहणार आहेत.
वाहतूक निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

या मार्गांवर प्रवेशबंदी

1. दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा आणि पुढे मालेगाव स्टॅण्डकडे ये-जा करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी.
2. मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्ड या मार्गावर दोन्ही दिशेची वाहतूक बंद.
3. पंचवटी विभागातील मालविय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते मालविय चौक या मार्गांवर दोन्ही दिशांनी सर्व वाहनांना प्रवेशबंदी.
4. सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

दिंडोरी नाक्याकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणारी वाहतूक पेठ फाटा, मखमलाबाद नाका, बायजाबाई छावणी, रामवाडी, चोपडा लॉन्समार्गे वळविण्यात येणार आहे. दिंडोरी नाक्याकडून जाणारी वाहतूक निमाणी, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंटमार्गे पुढे जाता येईल. मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणार्‍या वाहनांनी पेठ नाका मार्गाचा वापर करावा.

Traffic changes in Panchavati for four days during Ganeshotsav.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *