तृतीयपंथीयांना मिळणार आता ओळख!

समाजकल्याणमार्फत विशेष शिबिराचे आयोजन
द्वारका : वार्ताहर
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यामार्फत तृतीयपंथीयांसाठी  राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्याच्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र या पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे .त्यामुळे राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यासाठी नावीण्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने आता यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 23 मे ते दिनांक 14 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी नुकत्याच दिल्या आहेत. या विशेष शिबिरात तृतीयपंथीय व्यक्तींची सदर पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 30 मे ते 3 जून या दरम्यान तर नाशिक येथे दिनांक 30 मे रोजी हे विशेष शिबिर होणार आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संमेलन, कार्यशाळा आयोजित करणेसाठी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभागामार्फत सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तृतीयपंथी समूहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी, यावर नुकताच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईंड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे आणि श्री संत तुकाराम फाउंडेशन फोर फिलांथ्रोपी हे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करणे, याबाबत प्रथम प्राधान्य देऊन नोंदणीसाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत.

राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्या दूर होण्यासाठी तृतीयपंथीयांची नोंदणी होणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणा-या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करावे.
डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त ,समाज कल्याण विभाग

 

जिल्हा निहाय विशेष शिबिर

मुंबई व पुणे विभाग 23 मे ते 31 जून

नाशिक विभाग 30 मे ते 3 जून,

औरंगाबाद व लातुर विभाग 1जून ते 6 जून

नागपुर व अमरावती विभाग जिून ते 14 जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *