नाशिक : प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टयांमुळे प्रत्येक जण ट्रीपचा प्लॅन करत असतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे कुठेही जाता आले नाही. आता सर्व अनलॉक झाल्याने यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध ठिकाणी आपल्या बजेटनुसार फिरायला जाण्याचे प्लॅन आखले जात आहेत. हीच बाब लक्षात घेत ट्रॅव्हल्स कंपन्याही विविध ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. तसेच राज्य, आंतरराज्यीय आणि आंतराष्ट्रीय पर्यटनाचे प्लॅन केले जात आहे. बजेटनुसार विविध प्रकारच्या टूर पॅकेजला प्राधान्य दिले जात आहे.
मागील दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावानंतर आता अनलॉक झाले असून, आता सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांने अर्थिक नुकसान झाले तर अनेक व्यवसाय, उद्योग डबघाईला आले. मात्र सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायला बसला. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या आधी ज्यांनी बुकींग केले होते. कोरोनामुळे निर्बंध आल्याने जाता आले नाही अशांना पर्यटकांना त्यावेळी असलेल्या दरात प्रवास करता येणार असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
प्रवास खर्च महागला
मागील दोन वर्षात झालेल्या इंधन दरवाढीमुळे कोरोनाच्या आधी असणार्या प्रवास बजेटमध्ये आता वाढ झाली आहे.त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लॅन करणार्यांना वाढलेल्या बजेटचा विचार करूनच प्लॅन करावा लागत आहे.
या प्रवाशांना प्रवास खर्चात सूट
कोरोना प्रादुर्भावाच्या आधी ज्यांनी बुकींग केले होते. मात्र कोरोनामुळे निर्बंध आल्याने जाता आले नाही अशा पर्यटकांना त्यावेळी असलेल्या दरात प्रवास करता येणार असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
काश्मीर, कोकणला सर्वाधिक पसंत
उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. त्यात जम्मु काश्मीर, हिमाचल प्रदेश तर महाराष्ट्रातील कोकण दर्शन ट्रीपला पर्यटकांची पसंती मिळत आहे.
या स्थळांना पसंती
आष्टविनायक दर्शन
जम्मू – काश्मीर
वैष्णवी देवी
चारधाम
हिमाचल प्रदेश
चंदीगड
दिल्ली
काशी
डेहराडून
कुलू मनाली
महाबळेश्वर
कोरोनानंतर दोन वर्षांनी पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला आहे. पण कोरोनाच्या आधी ज्या प्रमाणात पर्यटकांचा उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रतिसाद मिळत होता.तसा प्रतिसाद अद्याप मिळत नाही.
रवींद्र बरडे ( चौधरी यात्रा कंपनी )