पॅकेटमधली नव्हे, पारंपरिक ज्ञानातून आणि टाकळ्याच्या बियांपासून तयार होणारी
– रमेश पडवळ
नाशिक : सकाळ झाली की हातात गरमागरम चहाचा कप हे चित्र आपल्यासाठी अगदी सर्वसामान्य. काही घरांमध्ये त्याची जागा कॉफीने घेतली आहे. कॉफी कल्चर अजूनही काहीसे उच्चभ्रूपणाशी जोडले जाणारे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावर सकाळच्या कपात येणारी कॉफी ना महागड्या बियांपासून बनलेली असते ना ती पाकीटबंद असते. जंगलात, माळरानावर आणि शेताच्या बांधावर सहज उगवणार्या टाकळ्याच्या बियांपासून तयार झालेली ही ‘कॉफी’ पेठ तालुक्यातील एकदरेच्या वारली आदिवासींच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. विशेष म्हणजे, पाहुणा घरी आला तरी त्याचे स्वागत चहाने नव्हे, तर याच पारंपरिक ‘कॉफी’ने केले असल्याने ती आदिवासी आतिथ्यपरंपरेचाही एक भाग बनली आहे. आंतरराष्ट्रीय कॉफी दिना (1 आक्टोबर)च्या निमित्ताने नाशिकच्या आदिवासी संस्कृतीतील ही अनोखी परंपरा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. कारण ही केवळ एखाद्या पेयाची गोष्ट नाही; तर जंगल, निसर्ग, अन्न आणि आरोग्य यांचे नाते पिढ्यान्पिढ्या समजून घेतलेल्या आदिवासी ज्ञानपरंपरेची ही एक झलक आहे. वरकरणी ती अगदी कॉफीसारखीच दिसते आणि भाजलेल्या बियांचा वासही कॉफीची आठवण करून देतो. फरक एवढाच की, इथे कॉफीच्या मळ्यांऐवजी आहे स्थानिक रानवनस्पती आणि शेकडो वर्षांचे पारंपरिक ज्ञान. या कॉफीची परंपरा पिढ्यानुपिढ्या सुरू असली तरी तिची लिखित नोंद कुठेही आढळत नाही. एकाने दुसर्याला सांगायचे, त्याने पुढच्या पिढीला शिकवायचे आणि प्रत्यक्ष वापरातून ज्ञान पुढे न्यायचे, अशा मौखिक परंपरेतून आदिवासी समाजाची ज्ञानपरंपरा टिकलेली आहे.
आजच्या डिजिटल युगात एका बाजूला मोबाइल आणि बाजारातील पाकिटबंद खाद्यपदार्थ आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत आहेत; तर दुसर्या बाजूला पिढ्यान्पिढ्या जपलेले रानभाज्या, औषधी वनस्पती आणि अन्नप्रक्रियेचे ज्ञान हळूहळू विस्मृतीत जात आहे.
बिया भाजल्या, दळल्या अन् तयार झाली ‘कॉफी’
स्थानिक पातळीवर तरोटा, तरवटा, तखटा, अटोरा अशा विविध नावांनीही ओळखल्या जाणारी टाकळा ही वर्षायू वनस्पती माळरान, शेतजमीन, रस्त्यांच्या कडेला, परसबागेत आणि पडीक जमिनीवर सहज उगवते. महाराष्ट्रात साधारण मे-जूनमध्ये तिची वाढ सुरू होते. पुढे तिला पिवळी फुले येतात आणि शेंगांमध्ये तपकिरी रंगाच्या बिया तयार होतात. याच बियांमध्ये दडले आहे या आदिवासी ‘कॉफी’चे रहस्य. टाकळ्याच्या बिया गोळा करून त्या व्यवस्थित सुकवून तव्यावर कडक भाजल्या जातात. भाजलेल्या बिया नाचणीप्रमाणे दळल्या की त्यातून तयार होते तपकिरी रंगाची बारीक पूड. ती टाकून जे गरम पेय तयार केले जाते त्याचा रंग, वास आणि स्वाद कॉफीसारखा जाणवतो.
रानभाजीपासून औषधी उपयोगापर्यंत
आदिवासींच्या पारंपरिक आहारात तिच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. मेथीप्रमाणे तिची भाजी बनविली जाते. टाकळ्याच्या पानांचा आणि बियांचा वापर पारंपरिक उपचारपद्धतीतही केला जातो. आदिवासी ज्ञानपरंपरेनुसार त्वचेच्या काही विकारांवर टाकळ्याच्या बियांचा लेप वापरला जातो. पानांचा काढा तसेच पानांचा आहारातील वापरही पारंपरिक पद्धतीने केला जातो. पचनाशी संबंधित काही तक्रारी आणि मुलांच्या आरोग्यासाठीही टाकळ्याचा उपयोग केला जात असल्याचे स्थानिक सांगतात.
Tribals in Nashik actually drink ‘coffee’ every day!