सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची रोकड घेऊन बँकेच्या कामासाठी नियुक्त असलेले दोन कर्मचारी पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन नाशिक विभागात ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव विश्वनाथ डोळे (वय 44, रा. सम्राट ट्रॅफिकाना, गंगापूर रोड, नाशिक) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या नाशिक सिटी शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी नियुक्त असलेले सुरेश हिरामण सोनकांबळे आणि अनुप सुरेश कुमावत यांनी महापालिकेच्या नवीन नाशिक विभागातून जमा झालेली रोकड घेतली. मात्र, ही रक्कम घेऊन दोघांनी पोबारा केल्याचा आरोप आहे. चोरी झालेल्या रकमेत सातपूर विभागातील सहा लाख एक हजार 134 रुपये, नाशिकरोड विभागातील तीन लाख 26 हजार 825 रुपये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महारोजगार केंद्रातील 83 हजार एक रुपये, गांधीनगर केंद्रातील 41 हजार 24 रुपये, इंदिरानगर विभागातील 44 हजार 61 रुपये आणि नवीन नाशिक विभागातील तीन लाख 84 हजार 291 रुपयांचा समावेश आहे.
अशा एकूण 14 लाख 80 हजार 336 रुपयांच्या रोकड अपहारप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवगिरे यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.