तरुण

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

– प्रा. योगेश हांडगे

आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन झी! हातात स्मार्टफोन, डोक्यात असंख्य प्रश्न, विचारांमध्ये स्वतंत्रपणा आणि निर्णय घेताना स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडण्याची सवय. या पिढीकडे पाहताना अनेकदा जुन्या पिढीच्या तोंडून एक वाक्य सहज बाहेर पडते-आमच्या काळी असं नव्हतं! पण प्रश्न असा आहे की, जेन झीने आमच्या काळासारखेच का असावे? प्रत्येक पिढी तिच्या काळाची निर्मिती असते. ज्या जगात जेन झी वाढली, ते जग तिच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाइन शिक्षण, जागतिकीकरण आणि सतत बदलणारे रोजगारविश्व यामुळे तिच्या विचारांची चौकटही बदलली आहे. त्यामुळे जेन झीला जुन्या चौकटीत बसवण्यापेक्षा तिची चौकट समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
जेन झीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रश्न विचारण्याची वृत्ती. हे असेच का? हा प्रश्न तिला पडतो. वरिष्ठांनी सांगितले म्हणून एखादी गोष्ट स्वीकारण्यापेक्षा त्यामागचे कारण जाणून घेण्याची तिची इच्छा असते. काहींना हा अवमान वाटतो; परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या काळाचा भाग आहे. प्रश्न विचारणार्‍या तरुणाला गप्प करण्यापेक्षा त्याला योग्य दिशा देणे ही मोठ्या पिढीची जबाबदारी आहे. मात्र याचा अर्थ जेन झीच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करावे, असा अजिबात नाही. समजून घेणे आणि शिस्त सोडणे यात फरक आहे. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही आवश्यक आहे. वेळेचे भान, कामाची शिस्त, सामाजिक संवेदनशीलता, वडीलधार्‍यांचा आदर आणि इतरांच्या मतांचा सन्मान ही मूल्ये कोणत्याही पिढीसाठी महत्त्वाची आहेत. जेन झीला ही मूल्ये आदेश देऊन नव्हे, तर संवादातून पटवून द्यावी लागतील.
आज अनेक पालकांची एक तक्रार असते-मुलं आमच्याशी बोलतच नाहीत. पण त्याच वेळी मुलांचे म्हणणे असते-आम्ही बोलायला गेलो की आधीच निर्णय झालेला असतो! या दोन वाक्यांमध्ये पिढ्यांमधील दरी लपलेली आहे. संवाद हवा असेल तर ऐकण्याची तयारी दोन्ही बाजूंनी असली पाहिजे. जेन झीशी बोलताना तिच्या प्रत्येक मताला विरोध करणे किंवा लगेच सल्ला देणे टाळले पाहिजे. कधी कधी तरुणाला उपाय नको असतो; त्याला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावेसे वाटते. तुला काय वाटते? हा साधा प्रश्न अनेकदा तू चुकीचा आहेस या वाक्यापेक्षा अधिक प्रभावी ठरतो. कार्यालयीन संस्कृतीतही हा बदल स्पष्ट दिसतो.
जुन्या पिढीसाठी नोकरी म्हणजे स्थैर्य; जेन झीसाठी नोकरीसोबत अर्थपूर्ण काम, मानसिक समाधान, लवचिकता आणि विकासाची संधी महत्त्वाची आहे. त्यामुळे तरुण कर्मचारी प्रश्न विचारतो, नवीन पद्धती सुचवतो किंवा कामाच्या पद्धतीवर मत व्यक्त करतो. त्याला अनुभव नाही म्हणून नाकारण्यापेक्षा त्याच्या कल्पनेत काय नवीन आहे, हे पाहण्याची गरज आहे.
त्याचबरोबर जेन झीनेही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी-अनुभवाला पर्याय नसतो. तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता आणि वेगवान माहिती मिळवण्याची सवय ही मोठी ताकद आहे; पण संयम, माणसे समजून घेणे, संकटात निर्णय घेणे आणि दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण करणे ही कौशल्ये अनुभवातून विकसित होतात. म्हणूनच संघर्षाऐवजी पिढ्यांनी एकमेकांकडून शिकण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. सोशल मीडियाने जेन झीला अभिव्यक्तीचे व्यासपीठ दिले आहे. पण त्याचबरोबर तुलना, दिखावा, त्वरित प्रसिद्धी आणि सततच्या मान्यतेची अपेक्षा यांचे दडपणही वाढवले आहे. प्रत्येक पोस्टला प्रतिक्रिया मिळाली पाहिजे, प्रत्येक यश दिसले पाहिजे आणि प्रत्येक क्षण शेअर केला पाहिजे, अशी मानसिकता धोकादायक ठरू शकते. येथेही उपदेशापेक्षा संवाद आवश्यक आहे.म्हणून जेन झीला बदलण्याआधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा-आपण तिचे जग खरोखर समजून घेतले आहे का?
ही पिढी परिपूर्ण नाही. तिच्यात उतावळेपणा आहे, अधीरता आहे, कधी कधी जबाबदारीपासून पळण्याची प्रवृत्तीही दिसते. पण प्रत्येक पिढीमध्ये काही कमतरता असतात. त्याचवेळी जेन झीकडे धाडस, तंत्रज्ञानाची जाण, नवकल्पनांची भूक, समानतेची जाणीव आणि प्रश्न विचारण्याची क्षमता आहे.त्यामुळे जेन झीला सुधारण्याचा हट्ट सोडून तिला घडवण्याचा संवाद सुरू करणे गरजेचे आहे.

Understand ‘Gen Z’ first!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago