तरुण

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

– अमोल जगताप

नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर संबंधित तरुणाने आत्महत्या केली. दोन तरुण जीव काही क्षणांत संपले, दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. या घटनेकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता, बदलत्या सामाजिक वास्तवाचे एक गंभीर प्रतिबिंब म्हणून पाहण्याची गरज आहे.
खरंतर प्रेम… हा शब्द उच्चारला की मनात अनेक भावना दाटून येतात. कोणाच्या चेहर्‍यावर हसू उमटते, तर कोणाच्या डोळ्यांत आठवणी दाटतात. पण अलीकडे प्रेमाच्या नावाखाली घडणार्‍या काही घटना मन सुन्न करून टाकतात. अशा घटना आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडतात, तो म्हणजे – प्रेमाची व्याख्या आपण खरोखर समजून घेतली आहे का?
आजची तरुण पिढी शिक्षण, नोकरी आणि करिअरच्या निमित्ताने घरापासून दूर राहते. सहवास वाढतो, मैत्री होते आणि कधी कधी आकर्षणही निर्माण होते. पण सोबत राहिलो, एकत्र काम केले किंवा मन जुळले म्हणजे ते प्रेमच असते, असा समज धोकादायक ठरू शकतो. प्रत्येक जवळीक ही आयुष्यभराच्या नात्याची हमी नसते.
आजचे जग वेगाने बदलत आहे. त्यात सोशल मीडिया, चित्रपट आणि आजच्या वेब सिरीज प्रेमाचे आकर्षक चित्र रंगवतात. पण दोन-तीन तासांच्या चित्रपटात दाखवले जाणारे प्रेम आणि प्रत्यक्ष आयुष्य यात खूप मोठा फरक असतो. आयुष्य हा काही चित्रपट नाही की चूक झाली तर पुढच्या दृश्यात सर्व काही सुरळीत होईल. इथे प्रत्येक निर्णयाचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात.
प्रेम ही सुंदर भावना आहे; पण एखाद्याने नाते पुढे नेण्यास नकार दिला, वेगळा मार्ग निवडला किंवा आयुष्यात नवीन निर्णय घेतला, तर त्याचा स्वीकार करण्याइतकी भावनिक परिपक्वता प्रत्येकाने विकसित करायला हवी. नकार स्वीकारता न आल्यावर निर्माण होणारा राग कधीच प्रेमाचे रूप असू शकत नाही.
आज अनेक तरुण प्रेमात इतके गुंतून जातात की स्वतःची ओळखच विसरून बसतात. करिअर, कुटुंब, स्वप्ने आणि स्वतःचे भविष्य यापेक्षा एकच व्यक्ती महत्त्वाची वाटू लागते. पण सत्य हे आहे की प्रेम हा आयुष्याचा एक भाग आहे; संपूर्ण आयुष्य नाही. लक्षात असू दया की आयुष्य हे अनेक नात्यांनी, अनेक स्वप्नांनी आणि अनेक जबाबदार्‍यांनी बनलेले असते. त्या प्रत्येक नात्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे; पण त्याचे उत्तर हिंसा कधीच असू शकत नाही. रागाच्या एका क्षणात घेतलेला निर्णय अनेक आयुष्ये उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच भावनांवर नियंत्रण ठेवणे, गरज पडल्यास कुटुंबीय, मित्र किंवा समुपदेशकांची मदत घेणे हे कमजोरीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण आहे. पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. मुलांना केवळ शिक्षण आणि करिअरच नव्हे, तर नात्यांमधील जबाबदारी, अपयशाचा स्वीकार आणि भावनिक संतुलन यांचाही वारसा देणे तितकेच आवश्यक आहे. कारण संस्कार हेच आयुष्याच्या कठीण वळणांवर योग्य निर्णय घेण्याचे बळ देऊ शकतात.
आजच्या तरुण-तरुणींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.. प्रेम करा, पण विचारपूर्वक करा. नाते जोडा, पण स्वतःला हरवू नका. आयुष्याच्या आणाभाका घेण्यापूर्वी स्वभाव, मूल्ये, जबाबदार्‍या आणि भविष्य यांचाही तितकाच विचार करा. क्षणिक आकर्षणावर आयुष्याचे निर्णय घेऊ नका.
कारण खरे प्रेम माणसाला जगायला शिकवते, संपवायला नाही.
आयुष्य हे काही दोन-तीन तासांचा चित्रपट नाही; ते अनेक दशकांचा प्रवास आहे. त्यामुळे आयुष्याचे निर्णय भावनेच्या भरात नव्हे, तर विवेक, संयम आणि परिपक्वतेच्या आधारावर घ्या. प्रेम सुंदर आहे; पण त्याहूनही सुंदर आहे विवेक. कारण विवेकाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात, तर भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्य उद्ध्वस्त करून जातात…

 

Is love life… or just a part of life?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago