– राजेश शिरभाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाची बारा वर्षे पूर्ण केल्याबद्दल सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. त्यानिमित्ताने याआधी सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी त्यांची तुलना केली जात आहे. वास्तविक दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये अशी तुलना करण्याचा काही संबंध येत नाही. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची दुसर्या देशाच्या व त्यांच्याच देशातील इतर पंतप्रधानांबरोबर तुलना करणे अनाठायी आहे.
कोणत्याही दोन व्यक्ती व त्यांची परिस्थिती ही वेगळी असते. त्या-त्या काळानुरूप उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या वापराने ते आपली कारकीर्द घडवत असतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा ते निवडणुका जिंकून झाले नव्हते. ते स्वतःच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते होते. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्याकडे आपसूक पंतप्रधानपद आले. त्यावर त्यांच्या विरोधकांनीही कधी आक्षेप घेतला नाही. जवाहरलाल नेहरू यांचा पक्षच स्वातंत्र्याचा लढा लढला होता. त्यामुळे त्यांच्याच हातात देशाची सूत्रे गेली. मोदींचा पक्ष त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात लढला नसल्याने त्यांच्याकडे सत्ता गेली नाही. मोदी त्यानंतर निवडणुका जिंकून व प्रचारातील आघाडीने पंतप्रधान झाले होते. नेहरूंनी जी लोकशाही तत्त्वे या देशात रुजवली त्याचा परिपाक नरेंद्र मोदी यांच्या विजयात होता. या देशातील जनतेला सरकार बदलण्याचे अधिकार असल्यामुळे हे शक्य झाले होते. दोघांच्या परिस्थितीबरोबरच दोघांच्या व्यक्तिमत्त्वातही मोठा फरक आहे. नेहरू हे देशातील एका सुशिक्षित, श्रीमंत घरात जन्माला आले. त्यांचे शिक्षणही परदेशात झाले. विद्यार्थी म्हणूनही नेहरू हे आघाडीवर होते. त्यांना नैसर्गिक बुद्धिमत्तेचे देणे होते. त्यांचे लेखन, त्यांचे वैचारिक स्थान हे वेगळे होते. श्रीमंतीत जन्म घेऊनही सर्वसामान्यांमध्ये त्यांनी कधी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले नाही. भारतीय राजकारणात आल्यानंतर त्यांचा वेशही साधा असायचा. ते सतत सामान्यांमध्ये मिसळले. त्यांच्याशी मैत्री केली. त्यावेळी मी काही मोठा आहे आणि तुम्ही लहान आहात, असे त्यांनी कधी दाखवले नाही. त्यांच्याकडे असलेली पदवी, त्यांच्या घराण्याचा असलेला दबदबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने त्यांचे भारले जाणे, त्यांच्यातील संवेदनशील कुटुंबवत्सलता, असे अनेक गुण त्यांच्याकडे होते. मोदी यांचे जीवन त्या मानाने फार संघर्षात गेले. गुजरातच्या एका सामान्य कुटुंबातून ते पुढे आले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा त्याग करून ते संघाचे प्रचारक झाले. त्यानंतर संघाच्या बरोबरच ते राहिले व संघानेही त्यांना पुढे आणले व राजकारणातील विविध पदांवर संधी देण्यात आली. मोदी यांनी भाजपा मोठा करण्यात विलक्षण, असे योगदान दिले. पंतप्रधान पदाच्या काळातही प्रत्येक राज्यातील आणि शहरातील महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकण्याकडे मोदींनी जातीने लक्ष दिले. प्रत्येक राज्याची स्थिती, त्यातील आव्हाने, विरोधकांची बलस्थाने त्यांच्याकडे असलेले मनुष्यबळ आणि त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल याच्या विचाराने त्यांनी पक्षाचे कार्य केले. महाराष्ट्रात त्यांनी आपल्या एकेकाळचा जवळचा असलेला शिवसेना हा पक्ष फोडला. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरल्या. त्यांना त्या कामात अनेकांची मदत झाली. नेहरूंनी मात्र पंतप्रधानपदानंतर पक्षाकडे फार लक्ष दिले नाही. देशात लोकशाही रुजावी आणि सर्वच पक्षांना आणि सर्वच स्तराला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केला. अर्थात, नेहरू हे पाश्चात्य देशात शिकलेले होते. त्यांच्या जाणिवा प्रगल्भ होत्या. या जगात काही चांगले करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावर घेतली होती. त्यामुळे आपल्या चांगल्या कामाच्या पाठीमागे पक्ष मोठा होईलच, असे त्यांना वाटले होते. झालेही तसेच. काँग्रेस पक्ष आपोआप मोठा होत गेला. नेहरूंच्या हातात हा देश जेव्हा आला होता तेव्हा तो एका परकीय सत्तेतून आला होता. त्यामुळे भारताचे नुकसान व्हावे असे ब्रिटिशांना तेव्हा वाटत होते. मोदी यांच्या हातात जेव्हा देश आला तेव्हा त्याला जगातील एका महान अथर्र्तज्ज्ञाने आकार दिलेला होता. जागतिकीकरणात भारताची एक निश्चित भूमिका तयार करण्यात आली होती. आयात-निर्यात धोरण, कर धोरण याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने देश प्रगतिपथावर होता. त्या देशाला मोदी यांनी आणखी पुढे नेले. आज देशाची मान सार्या जगात उंच आहे. अमेरिकेबरोबर आपले अगदी घनिष्ट असे संबंध मोदींनी प्रस्थापित केले आहेत. जगात त्यांना विश्वगुरू असे म्हटले जाते. नेहरूंच्या काळात भारताची नुकतीच एक राष्ट्र म्हणून ओळख व्हायला सुरुवात झाली होती. नेहरूंसारखा नेता असल्याने जगाने आपल्याला फार लवकर स्वीकारले. आजही जगातील अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये आपला तितकाच सन्मान आहे. देशाचा पंतप्रधान काही निश्चित जबाबदारी घेऊन आलेले असतात. ते आपापल्या परीने ही जबाबदारी पार पाडत असतात. या देशाच्या संविधानाने या पदाला दिलेली कर्तव्ये पार पाडावी लागत असतातच. त्या काळात देशाची निरंतर प्रगतीही होत राहते. देशाची निर्मिती झाल्यानंतर आपल्याला नेहरूंसारखे पंतप्रधान लाभले होते, हे आपल्या देशवासीयांचे भाग्य आहे. हे नेहरूंचे विरोधकही मान्य करतात. मोदींमुळे भारत जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला, हेही मान्य करावेच लागते.
Unnecessary comparison!