मालेगाव, चांदवडला अवकाळीचा तडाखा

पत्र्याची शेड कोसळून तरुणाचा मृत्यू; कांदा, चारा भिजला

फैज मोहम्मद अनिस अहमद

मालेगाव/चांदवड
मालेगाव शहरासह चांदवड परिसरात रविवारी (दि. 24) दुपारी सव्वाचारच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
मालेगाव शहरात रविवारी सुरू झालेल्या वादळी पावसादरम्यान उडून आलेल्या पत्र्याच्या शेडचा फटका बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. फैज मोहम्मद अनिस अहमद (वय 32, रा. खालिद पार्क, पवारवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत
आहे.
पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील कुवेतुल इस्लाम मशिदीसमोर ही घटना घडली. अचानक सुरू झालेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी फैज अहमद हे एका घराच्या आडोशाला उभे होते. त्याचवेळी परिसरातील एका कारखान्याचे पत्र्याचे शेड जोरदार वार्‍यामुळे उडून आले. सदर शेड प्रथम विजेच्या खांबावर आदळले आणि त्यानंतर थेट फैज यांच्या डोक्यावर कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही नागरिक जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने फैज अहमद यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शफीक अँटीकरप्शन यांनी अग्निशामक दल व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पवारवाडी पोलिसांसह अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जोरदार वार्‍यामुळे विजेचा खांब वाकून विद्युत तारा पावसाच्या पाण्यात पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रावळगाव बाजारपेठांमध्ये चिखल
मालेगाव शहरासह तालुक्यात रविवारी (दि. 24) दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दुपारी सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील दैनंदिन कामकाज काही काळ विस्कळीत झाले. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी दुकाने, शेड आणि इमारतींचा आसरा घ्यावा लागला. तालुक्यातील रावळगाव येथे रविवारी साप्ताहिक बाजार सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. व्यापार्‍यांना आपले साहित्य झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. पावसामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, दाभाडी व टेहेरे परिसरातही वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला. उमराणे सह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावल्याने हवेतील गारव्यामुळे इकडे आणि अहिराणी झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु मान्सूनपूर्व पावसाच्या अचानक आगमनाने शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

मंदिर परिसरात पाणी शिरले

चांदवड परिसरात तब्बल दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अवकाळी पावसाचा फटका नागरिकांसह शेतकरी वर्गालाही बसला. पावसामुळे शहरातील वरचे गाव हत्तीखान परिसरातील आई माऊलींच्या मंदिरातही पाणी शिरल्याची घटना घडली. परिसरातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी थेट मंदिर परिसरात शिरल्याचे नागरिकांनी सांगितले.शेतकर्‍यांचा साठवूठ ठेवला कांदा व चारा या पावसामुळे भिजला.

नाशिकला यलो अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकसह राज्यातील 11 जिल्ह्यांत पुढील तीन तासांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलक्या पावसाच्या सरी आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने मुंबई केंद्राने इशारा दिला आहे. रविवारी (दि.24) सायंकाळी 7 वाजता जारी करण्यात आलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’नुसार नाशिक जिल्ह्यासाठी ‘यलो वॉर्निंग’ देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर,
सांगली, सातारा व अहिल्यानगर या जिल्ह्यांत पुढील तीन तासांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. दरम्यान, नाशिक हवामान केंद्राच्या नोंदीनुसार रविवारी नाशिकचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी सापेक्ष आर्द्रता 79 टक्के तर सायंकाळी 52 टक्के नोंद झाली. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत पावसाची नोंद शून्य मिलिमीटर राहिली असली, तरी हंगामी पर्जन्यमान 40.8 मिमी इतके नोंदविण्यात
आले आहे. हवामान विभागाने नागरिकांना वादळी वातावरणात उघड्यावर न थांबणे, विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे तसेच झाडाखाली थांबणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः शेतकरी, प्रवासी आणि दुचाकीस्वारांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Unseasonal rain hits Malegaon, Chandwad

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *