– मुकुंद बाविस्कर
नाशिकची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि संगीतविश्वातील योगदानाचा विचार केला तर एका सुरेल आणि भावपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे नाव अग्रक्रमाने समोर येते. ते म्हणजे, गायिका रागिणी कामतीकर. स्वरांशी अतूट नाते सांगणार्या रागिणी कामतीकर यांनी आपल्या अष्टपैलू गायकीने आणि सामाजिक बांधिलकीने रसिकश्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. स्वराजित संगीत अकॅडमी आणि सामाजिक बांधिलकी जोपासत रागिणी कामतीकर या केवळ व्यासपीठावरील कलाकार नसून, एक उत्तम संगीत शिक्षिका आणि संवेदनशील नागरिक आहेत. आपल्या ‘स्वराजित संगीत अकॅडमी’च्या माध्यमातून त्या नवोदित गायक-गायिकांना संगीताचे धडे देत व्यासपीठ उपलब्ध करून देतात. ‘गाणे ही एक अखंड तपस्या आहे. मेहनतीला पर्याय नाही,’ असा संदेश त्या आपल्या विद्यार्थ्यांना देतात. विशेष म्हणजे, शाळा, गरजू सामाजिक संस्था आणि वंचित घटकांना मदतीचा हात देऊन त्या सामाजिक बांधिलकीचा वसादेखील जोपासत आहेत.
रागिणी कामतीकर या मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. त्यांचे वडील कै. रवींद्र कुलकर्णी यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच घरातील सांगीतिक वातावरणामुळे त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यांचे प्रारंभिक शिक्षण पं. बाळासाहेब बहिरगावकर यांच्याकडे झाले. पुढील संगीताच्या अभ्यासात त्यांना शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात प्रा. डॉ. चित्रलेखा देशमुख, प्रा. डॉ. करुणा देशपांडे आणि प्रा. डॉ. विजयालक्ष्मी बर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध गायक विश्वनाथ ओक व माधुरी ओक यांच्याकडे शास्त्रीय, सुगम व नाट्यसंगीताचे बारकावे आत्मसात केले.
विशेष म्हणजे, एम.ए.-म्युझिक करताना त्यांनी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्राप्त केली. लग्नानंतर नाशिकमध्ये आगमन झाल्यावर रागिणी कामतीकर यांची रंगमंचावरील खर्या प्रवासाला सुरुवात झाली. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी स्थानिक संगीत क्षेत्रात ओळखी वाढवल्या. सुरुवातीला सहगायन केल्यानंतर ‘चाँद फिर निकला’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी स्वतंत्रपणे गायनाला सुरुवात केली. शास्त्रीय संगीताचा पक्का पाया, श्वासावरील नियंत्रण, स्वरांवरील हुकुमत आणि सुगम संगीताची उत्तम समज यामुळे त्यांच्या गायकीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, रागिणी कामतीकर या आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागाच्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. त्यांनी अनेक व्यावसायिक जाहिरातींसाठी पार्श्वगायन केले असून, प्रसिद्ध संगीतकार धनंजय धुमाळ यांच्यासोबत ‘शाम सिल्क’ची प्रसिद्ध जिंगल आणि ‘नाग्या’ प्रकल्पात योगदान दिले आहे. त्यांचे काही अत्यंत गाजलेले विशेष कार्यक्रम म्हणजे लतादीदींना सांगीतिक आदरांजली होय. जगप्रसिद्ध गायिका स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपले श्रद्धास्थान मानणार्या कामतीकर गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी दीदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करतात. यात त्या एकट्या 28 गाणी सादर करतात. मेरी आवाज ही पहचान है हा असाच एक लोकप्रिय उपक्रम ठरला आहे. एक सुरिली अनुभूती या त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे या स्वतंत्र कार्यक्रमाला देश-विदेशात प्रचंड मागणी असते.
कवितेचे झाले गाणे :
मराठीतील दिग्गज कवींच्या उदा. संत ज्ञानेश्वर, ग्रेस, ना. धों. महानोर, सुरेश भट, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या कवितांचे सुंदर गाण्यांमध्ये रूपांतर झाले. अशा रचनांवर आधारित हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी शंकराचार्य न्यास आणि कुसुमाग्रज स्मारकात सादर केला आहे. त्याचप्रमाणे कुसुमाग्रज स्मृती यात्रा कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहा दिवसांच्या उपक्रमात गेल्या आठ वर्षांपासून त्या सुधीर मोघे, शान्ता शेळके, ग. दि. माडगूळकर, आशा भोसले अशा महान दिग्गजांच्या थीमवर कार्यक्रम सादर करतात.
विविध थीम बेस्ड शो :
शेड्स ऑफ रागा (स्वर सावाना), अवघा विठ्ठल (आषाढी एकादशी विशेष), सुनहरी यादें (शंकर-जयकिशन विशेष), राहिले रे दूर घर माझे (शांता शेळके विशेष) आणि आशा ही आशा (आशा भोसले विशेष). त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह (मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर व जळगाव), कर्नाटक (निपाणी, बेळगाव), हैदराबाद, भोपाळ, लखनऊ, तसेच दुबई आणि मॉरिशस येथेही आपल्या गायकीचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या गायकीची प्रशंसा पं. छोटा गंधर्व, बाबासाहेब पुरंदरे, उषा मंगेशकर, श्रीनिवास खळे, संगीतकार आनंदजी, रवींद्र जैन, शैलेंद्र सिंग, श्रीधर फडके, पं. जितेंद्र अभिषेकी, डॉ. जब्बार पटेल, सुरेश वाडकर व हरिहरन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी केली आहे. आतापर्यंत त्यांच्या कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रमुख सन्मान मिळाले आहेत.
सामाजिक योगदान :
नाम फाउंडेशन आपल्या विद्यार्थ्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांमधून निधी उभारून नाना पाटेकर यांच्या नाम संस्थेला एक लाख 75 हजारांंचा धनादेश सुपूर्द केला.
कर्णबधिर मुलांसाठी मदत :
नाशिकमधील कर्णबधिर शाळेतील 5 ते 15 वयोगटातील मुलांना वैद्यकीय तपासणी करून चांगल्या दर्जाचे कानाचे मशिन उपलब्ध करून दिले. शालेय साहित्य व वाद्य वाटप : सिडकोतील एका शाळेतील 280 गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर-युनिफॉर्म दिले. वेदशाळा व गरजू बालकलाकारांना हार्मोनियम आणि तबला भेट दिला.
जलसेवा उपक्रम : रोटरी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून चक्रतीर्थ महाले वस्तीतील 400 गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देण्यासाठी सांगीतिक माध्यमातून निधी उभारला. शास्त्रीय संगीताची गाढ शिस्त, सुगम संगीताची आत्मीयता, रियाजातील सातत्य आणि समाजाविषयीची कृतज्ञता यांचा दुर्मिळ संगम म्हणजे रागिणी कामतीकर! संगीताची साधना करत नाशिकचे नाव देश-विदेशात उज्ज्वल करणार्या या सुरेल गायिकेचा स्वरप्रवास रसिकांसाठी आणि नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
चित्पावन ब्राह्मण संघात मैफल रंगली :
चित्पावन ब्राह्मण संघातील गान मैफलींना प्रदीर्घ परंपरा आहे. या संघातर्फे गणेशोत्सवानिमित्त पावन स्वर उपक्रमांतर्गत तरुण गायक भाग्येश मराठे यांच्या गायनाची मैफील आयोजित केली होती. या परंपरेला साजेशा मैफलीत भाग्येश या तरुण, तडफदार गायकाने रसिक-श्रोत्यांना तृप्त केले. रंगलेल्या मैफलीची सांगता हरी मेरो जीवन प्राण आधार या बंदिशीने करून भाग्येश यांनी सुरेल कळस चढवला. मराठे यांनी काही आठवणी सांगून संगीत परंपरेला उजाळा दिला. त्यांनी मैफलीचा प्रारंभ पूर्वी रागातील विलंबित तीन तालातील नैय्या मेरी पार करो साई या बंदिशीने केला. दृत बंदिश धन धन दुल्हन भाग न तेरो रसिकांना भावली. उत्तरार्धात जोगकंस रागातील बडा ख्याल सादर केला. विलंबित एकतालात सुगर बर पायो या बंदिशीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. अखेरीस आजोबा पं. राम मराठे यांची गाजलेली हरी मेरो जीवन प्राण आधार या रचनेने सुरेल सांगता झाली. भाग्येश मराठे देशातील समकालीन तरुण गायकांमध्ये आघाडीवर आहेत. वडील पं. संजय मराठे यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर पुढे डॉ. गंगूबाई हंगल गुरुकुलम येथे पं. केदार बोडस यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर व भेंडीबाजार घराण्यांची गायकी आत्मसात केली आहे. त्याचा प्रत्यय मैफलीत आला.
Upholding social commitment alongside vocal music through the Swarajit Sangeet Academy.