भुसावळ विभागामार्फत रेल्वे स्टेशनमध्ये विविध विकासकामे सुरू

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे सिंहस्थ कुंभमेळा होणार असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर व्यापक, नियोजित व कालबद्ध पायाभूत सुविधा विकास कार्य राबविण्यात येत आहे. कुंभसाठी रेल्वेने सुमारे तीन कोटी भाविकांची अभूतपूर्व गर्दी अपेक्षित असून, ही संख्या कुंभमेळा 2015 च्या तुलनेत जवळपास 50 पट अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागाने रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करणे, स्थानकांची क्षमता वाढविणे तसेच प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे.
भाविक रेल्वे प्रवाशांच्या प्रचंड संख्येचे सुरक्षित आणि कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा, सिग्नलिंग प्रणाली तसेच यार्ड लेआउट यांचे मजबुतीकरण करण्यात येत आहे.
अंमलबजावणी धोरणांतर्गत नागरी, ट्रॅक, सिग्नलिंग व दूरसंचार तसेच विद्युत विभागांतील कामांना प्राधान्य देण्यात आले असून, पाच प्रमुख स्थानकांवर नॉन-इंटरलॉक्ड कमिशनिंग व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ही कामे केली जात आहेत. स्टेबलिंग लाइनसाठी आवश्यक ट्रॅक लिंकिंग व विद्युत टीआरडी कामे पुढील टप्प्यांत नियोजित आहेत.
मनमाड-इगतपुरी विभागात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग कामे टप्प्याटप्प्याने केली जात असून, यामुळे सुरक्षा व विभागाची वहन क्षमता सुधारणार आहे. उगाव आणि निफाड स्थानकांवरील कामे कुंभमेळ्यानंतर राबविण्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहेत. ओढा स्थानकावरील ट्रॅक,
फॉर्मेशन, सिग्नलिंग व दूरसंचार आणि ओएचई कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहेत.
देवळालीत कामे वेगात
देवळाली रेल्वे स्थानकावर रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. यार्ड रिमॉडेलिंग तसेच पूरक सुविधा विकसित करण्यात येत असून, त्यामुळे गाड्यांच्या संचालनात आणि प्रवासी व्यवस्थापनात सुधारणा होणार आहे. आवश्यक रेल्वे कार्यालये व देखभाल सुविधांचे बांधकाम सुरू असून, गाड्यांच्या स्टेबलिंग व तपासणी व्यवस्थेसाठी माती भराव कामे प्रगतीपथावर आहेत. भराव कामे अधिकृत संस्थांमार्फत करताना कठोर गुणवत्ता तपासणीसह रेल्वे व सुरक्षा मानकांचे पालन करून करण्यात येत आहेत.
तसेच खेरवाडी, कसबे सुकेणे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.

नाशिकरोडला कामे सुरू

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी प्लॅटफॉर्म रुंदीकरण व यार्ड रिमॉडेलिंगची कामे सुरू आहेत. डाऊन प्लॅटफॉर्म तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक चारचे रुंदीकरण करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी पादचारी उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. त्याचे आराखडे मंजूर असून, गर्डर निर्मितीचे काम मनमाड वर्कशॉपकडे सोपविण्यात आले आहे.

ओढा येथे कामे प्रगतीपथावर

ओढा स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली इमारतीचे बांधकाम, ट्रॅक व फॉर्मेशनची कामे तसेच सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन आणि ओव्हरहेड इक्विपमेंट कामे प्रगतीपथावर आहेत. समन्वयाने अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ओपन लाइन व कन्स्ट्रक्शन युनिट्सदरम्यान संयुक्त हस्तांतरण-स्वीकृती आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ही सर्व कामे दुसर्‍या टप्प्यात कार्यान्वित होतील. प्रवाशांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र होल्डिंग क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे.

Various development works underway at railway station through Bhusawal division

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *