सुंदरनगरमध्ये वाहनांची तोडफोड

परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री टवाळखोरांच्या टोळक्याने धुडगूस घालत अनेक वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत अनेक दुचाकींसह इतर वाहनांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी मोबाइल व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सहा दुचाकींवरून आलेल्या तीन ते चार टवाळखोरांनी हातात धारदार शस्त्रे घेत परिसरात आरडाओरड करत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांवर सपासप वार केले. गाड्यांवर मोठे दगडे टाकून तोडफोड केली. त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. अनेकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर पडणे टाळले, तर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, काही सतर्क नागरिकांनी संपूर्ण प्रकाराचे मोबाइलवर चित्रीकरण केले असून, हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Vehicles vandalized in Sundarnagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *