कोण केतकी चितळे? काय तिचं देशाप्रति योगदान… की ती कोणालाही काहीही बोलू शकते? जे देशासाठी सारं काही वेचतात तेही आपल्या विरोधकांचा सन्मान करतात. ते आपल्याहून मोठे असतील तर आदर व्यक्त करण्याची या राज्याची परंपरा आहे. ही संस्कृती सामान्यातल्या सामान्यांनीही आपलीशी केली. पण केतकीसारख्या अर्धवट ज्ञान असलेल्यांना ते कळू नये, याचं अजब वाटतं. सांगताना आपण ब्राह्मण असल्याचं जाणवून द्यायचं आणि त्या समाजाला असलेल्या पात्रतेचा विसर पाडायचा ही नवी पद्धत सुरू आहे. यामुळेच काही महिला समोरच्या विरोधकाला घालून पाडून बोलताना दिसतात. माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी यात आघाडीवर असतेच, पण चित्रा वाघ, दीपाली सय्यद यांच्यासारख्या कथित प्रवक्त्याही अशीच बडबड करत आपल्या पक्षाचं हसं करताना दिसतात. अशांच्या वक्तव्यांनी वाद निर्माण होऊनही त्यांना पक्षनेते रोखत नाहीत याची कमाल वाटते. जबाबदार असे बोलू लागल्यावर केतकीसारख्या उडपटांगांना रान मोकळं मिळतं आणि त्या काहीही बरळतात.
देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या व्यंगावर आणि त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर खालच्या पातळीवर टीका करणारी कविता पुढे पाठवून केतकीने सार्या मर्यादा पार केल्या होत्या. कोण्या नितीन भावे नामक वकिलाने लिहिलेल्या या कवितेत पवारांविषयी इतकं विष पेरलं की पवार म्हणजे या देशाचे जणू मारेकरीच असावेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचा अधिकार शाबूत ठेवून अनेकांनी त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले. मग त्यांनी पुलोद काळात अचानक सरकारमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय असो वा वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असो. त्यांच्यावर माध्यमांनी आणि त्यांच्या विरोधकांनी प्रखर टीकास्त्र सोडलेलंही आपण पाहतो. टीका झाली म्हणून त्यांनी कोणाला दोष दिला नाही. अगदी गोपीनाथ मुंडे यांनी तर त्यांना दाऊदबरोबर विमानात बसवलं. पण साडेचार वर्षांच्या सत्तेत मुंडेंना ते राज्याचे गृहमंत्री असूनही खरं करून दाखवता आलं नाही. मात्र, तरीही मुंडेंनी त्यांची माफी मागितली नाही. आणि ती नाही मागितली म्हणूनही पवार यांनी त्यांना दोष दिला नाही. काहीसे अधिकार आल्यावर हवं ते बोलण्याची आपल्यातल्या राजकारण्यांनी प्रथा पाडून घेतली आहे. पवारांवर अश्लाघ्य टीका करणार्या केतकी चितळे हिचं समर्थन करणार्यांचंही असंच झालंय. मग त्या तृप्ती देसाई असतील वा सदाभाऊ खोत असतील. केंद्रातले एक मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनाही केतकीने केलेल्या या अश्लाघ्य टीकेचं भरतं आलंय. ती हे बोलू शकते, याचं कौतुक करताना या नेत्यांनी आपण किती मूर्ख आहोत, हे जगाला दाखवून दिलं आहे. पवारांविषयी त्यांच्या मनात किती घृणा आहे, हेही त्यांनीच सोदाहरण पटवून दिलं. पवारांचं राजकारण एखाद्याला पटत नसलं तरी टीका करताना काही मर्यादा या पाळल्याच पाहिजेत. त्या पाळता येत नसतील तर अशा व्यक्तींची रवानगी तुरुंगात होणं स्वाभाविक आहे.
पवारांवरील टीकेचं समर्थन करताना भाजपादी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणार्या टीकेकडे बोट दाखवतात. मात्र, केतकी चितळेने पवारांवर केलेली टीका आणि फडणवीस यांच्यावर होणारी टीका यात जमीन अस्मानाचा फरक आहे, हे ते विसरतात. अशी टीका करणार्यांचं समर्थन विरोधकांनी कधी केल्याचं ऐकीवात नाही. मग केतकीच्या वक्तव्याचं समर्थन करण्याची उपरती त्यांना होते कशी? बरं जिचं समर्थन आपण करतो, ती अगदीच स्वच्छ आहे, असं मानण्याची परिस्थिती नाही. ती नवी मुंबईतील कळंबोली या ठिकाणी राहाते तिथली तिची वर्तणूक ही आगलावी असल्याचं एव्हाना बाहेर आलंय. ज्या सोसायटीत ती राहते तिथल्या नागरिकांना होणारा त्रास हा खोत, वाघांसारख्यांनी जाऊन पाहावा. तिथल्या नागरिकांशी चर्चा करावी. म्हणजे केतकी ही काय चीज आहे, याची जाण येईल. खोत आणि वाघांच्या जिभेला हाड नसतं हे राज्यातील जनतेने अनेकदा पाहिलं आहे. पवार हे आपले राजकीय विरोधक असल्याची या मंडळींना इतकी पोटदुखी आहे की, आपण कसलं समर्थन करतो, याचीही जाण त्यांना राहिलेली दिसत नाही. खोत तर केतकी चितळे ही कणखर असल्याचा दाखला देतात. पण ती किती उपद्वापी आहे, हे ते पाहत नाहीत. तिला कोणाच्या समर्थनाची आवश्यकता नाही, असं सांगणारेच तिचे समर्थक असतील इतरांची आवश्यकताच नाही, हे खोतांना सांगावं कोणी? केंद्रात एका महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळणार्या धर्मेंद्र प्रधान यांनी देशातल्या विरोधकांना यानिमित्त अभिव्यक्ती शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेच केतकीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटत असल्याचं प्रधान यांचं म्हणणं जितकं बालिश आहे तितकंच ते अर्धवट म्हटलं पाहिजे. स्वयंघोषित महिला नेत्या तृप्ती देसाईंना केतकीच्या कवितेत केवळ पवार दिसले. शरद पवार असं नाव नव्हतं, असं सांगत त्यांनी एकार्थी केतकीचं समर्थनच केलं आहे.
केतकीने यापूर्वीही अनेकदा असला मूर्खपणा केला होता. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करत केतकीने आपली पातळी दाखवून दिली होती. हे प्रकरण स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआच्या शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाने सुरू झालं. प्रचंड टीका झाल्यावर जोशुआने शिवप्रेमींची माफी मागितली होती. जोशुआच्या या टीकाकारांना बोल सुनावताना या बयेने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. जेव्हा अडचणीत येते तेव्हा केतकीला माजी मुख्यमंत्र्यांची आठवण येते. आता याही प्रकरणात ती माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडच
निमित्त करत तिने बौध्द समाजावर आसुड ओढलं होतं. यावेळी तर तिने कहरच केला. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून मुंबईत येणार्या आंबेडकरांच्या चाहत्यांवर तिने ते फुकटे असल्याचा आरोप केला. या दिवशी मुंबईच्या फुकट दर्शनाला येतात आणि जिवाची मुंबई करतात असं म्हणत केतकीने तमाम आंबेडकर चाहत्यांचा अवमान केला होता. तेव्हा स्वप्नील जगताप यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अति होऊ लागल्यावर केतकीला एपिलेप्सीचा आजार असल्याचं निमित्त आता पुढे केलं जाऊ लागलं आहे. मेंदूला येणार्या झटक्याने ती अशी वागत असल्याचं तिचे समर्थन म्हणतात. पण असे झटके येतात तेव्हा तिला शिवाजी महाराज, बौद्ध धर्मीय, शरद पवारच बरे आठवतात. तिथे भाजपच्या नेत्यांची आठवण या झटक्यांना बरी येत नाही. वायफळ लिहिण्याची अक्कल या झटक्यांतून येते हे यापूर्वी ऐकलं नव्हतं.
शरद पवारांविषयीची ही घृणा उगाच आली असं कोणाला वाटेल. पण तसं नाही. पवारांमुळे आपली सत्ता गेली, याची सल भाजपच्या नेत्यांना आणि त्यांच्या भक्तांना आहे. आपल्या शेपटीवर पाय देऊन सत्तेपासून भाजपला दूर ठेवणार्या शिवसेनेला राज्याच्या सत्तेत घेऊन पवारांनी भाजपला चेकमेट केलं. पवारांची ही कृती भाजप नेत्यांना गैरवाजवी वाटू शकते. म्हणून तो संदर्भ कायम डोक्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. सत्ता ही काही अनादी काळाचा मेनू नाही. सत्तेत बसणार्यांनी विरोधी पक्षात बसण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. या सत्तेसाठी भाजपचे नेते इतके उतावीळ झालेत की त्यांच्या एकाही प्रयत्नाला यश आलं नाही. पवारांमुळेच आपण राज्याच्या सत्तेबाहेर आहोत एव्हाना त्यांना ठावूक झालंय. यातूनच मग पाठीराखे असली वक्तव्यं करत स्वत:बरोबरच पक्षालाही अडचणीत आणतात याचं केतकी प्रकरण हे प्रत्यंतर होय.
प्रवीण पुरो