सिन्नरमध्ये आगीचे सत्र सुरूच; तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात; कोट्यवधीचे नुकसान
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात आगीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. माळेगाव एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि. 4) सकाळी ‘विमा अॅरोमॅटिक्स’ या अगरबत्ती उद्योगाला भीषण आग लागली. सकाळी सुमारे अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत काही तासांतच संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर ज्वालाग्रही रसायनांचा साठा असल्याने आग क्षणात भडकली. सुदैवाने कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
नाशिक-पुणे महामार्गालगत मोहदरी वनोद्यानाजवळ असलेल्या या कंपनीत अगरबत्तीसाठी लागणारी ‘यारा यारा क्रिस्टल पावडर’ तयार केली जात होती.
आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले. महामार्गावरून जाणार्या प्रवाशांनी ही दृश्यं पाहण्यासाठी वाहने थांबवली. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली.
सलग लागणार्या आगींमुळे सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, प्रशासनानं तातडीने तपासणी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि उद्योजकांकडून होत आहे.
आगीची माहिती मिळताच माळेगाव अग्निशमन दलाचे दोन बंब आणि सिन्नर नगरपरिषदेचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, रसायनांची आग असल्याने साध्या पाण्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यानंतर नाशिक महापालिकेचा अतिरिक्त बंब आणि एमआयडीसीतील खास ‘फोम टेंडर’ मागवण्यात आला.
फेसयुक्त पाण्याचा मारा केल्यानंतर दुपारी सुमारे दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आलं. खबरदारी म्हणून महावितरणने परिसरातील वीजपुरवठा तात्काळ बंद केला होता.
तीन दिवसांत तीन ठिकाणी आग
सिन्नरच्या औद्योगिक भागात सलग तिसर्या दिवशी आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कोरिगेटेड बॉक्स कंपनीला आग लागून सुमारे 10 लाखांचं नुकसान झालं. मंगळवारी माळेगाव येथील पेपर रोल कंपनीला आग लागून अंदाजे 12 लाखांचं नुकसान झालं. बुधवारी मात्र विमा अॅरोमॅटिक्स कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली.
सुरक्षेकडे दुर्लक्ष?
कंपनी परिसरात अत्यंत ज्वालाग्रही रसायनांचा साठा असूनही आवश्यक मोकळी जागा नसल्यामुळे आग विझवताना अडचणी आल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. औद्योगिक विकास महामंडळ आणि अग्निशमन विभागाकडून वारंवार सूचना दिल्या जात असतानाही अनेक उद्योजक त्याकडे दुर्लक्ष करतात, असे एमआयडीसीचे अधिकारी अतुल सोनवणे यांनी सांगितले.
‘Vima Aromatics’ in Malegaon MIDC burnt down
नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…
मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…
नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…
दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…