प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे यांचा अधिकार्‍यांसह महापालिकेत ठिय्या

प्रभाग सहामधील मेहेरधाम परिसरातील पाणीप्रश्न पेटला

पंचवटी : प्रतिनिधी
पेठरोड परिसरातील मेहेरधाम, यशोदानगर, पवार कॉलनी यांसह विविध भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करणार्‍या प्रभाग क्रमांक 6 मधील संतप्त महिलांनी बुधवारी (दि.15) सकाळी थेट पंचवटी विभागीय कार्यालयावर धडक दिली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे यांनी बोलावले होते. या बैठकीकडे नलावडे वगळता अन्य कनिष्ठ अभियंत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आणि नागरिकांनी थेट महानगरपालिका गाठत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र धारणकर यांना घेराव घातला.
पंचवटी विभागाच्या सभापती रोहिणी बापूराव पिंगळे यांनीही नागरिकांच्या सोबतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करत, पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेठरोड परिसरातील मेहेरधाम, यशोदानगर, पवार कॉलनी, तवली फाटा, संत भगवान बाबानगर आणि अश्वमेधनगर या भागात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि पुरेशा दाबाने मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी बुधवारी थेट प्रभाग सभापती कार्यालयात धाव घेतली. नागरिकांच्या या तीव्र भावनांची दखल घेत सभापती रोहिणी पिंगळे यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाचे अभियंते आणि व्हॉल्व्हमन यांची संयुक्त बैठक बोलावली. नागरिकांना पाणी देण्यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाईची मागणी केली जाईल, असा कडक इशारा यावेळी सभापतींनी अधिकार्‍यांना दिला.
महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सभापती रोहिणी पिंगळे यांनी अधिकार्‍यांसह संबंधित टंचाईग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर दुपारी चार वाजता पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र धारणकर यांच्यासोबत या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतापलेल्या महिलांनी आणि नागरिकांनी मुख्य अभियंता धारणकर यांना घेराव घातला. यावेळी सभापती पिंगळे यांनी नागरिकांसह ठिय्या धरत तात्काळ आणि नियमित पाणीपुरवठ्याची ठाम मागणी लावून धरली. या आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी व मुख्य अभियंत्यांनी या समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले असून हा प्रश्न कायमचा मार्गी लावला जाईल, असे सांगत सभापती व महिलांना आश्वस्त केले आहे.

पंचवटी विभागातील पाणीप्रश्न अत्यंत गंभीर असून, याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मेहेरधाम परिसरातील महिलांनी कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. या गंभीर समस्येची दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांना बोलावून पाणीप्रश्न युद्धपातळीवर सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना नियमित, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
– रोहिणी बापूराव पिंगळे, प्रभाग सभापती, पंचवटी

 

Ward Chairperson Rohini Pingle sits with officials at the Municipal Corporation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *