आहुर्ली : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग हे गाव विद्युत जनित्र जळाल्याने व आवश्यक वीजपुरवठ्यापेक्षा कमी क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवल्याने हे गाव तीन महिन्यांपासून अंधारात आहे. दरम्यान वीज वितरण कंपनी व स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वांरवार कळवूनही हे गाव अंधारातच आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेच्या आवश्यक विविध समस्यानां तोंड दयावे लागत आहे.
इगतपुरी तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात 28 जानेवारीला ट्रान्सफार्मर जळाला होता. तेव्हापासून तीन महिने उलटूनही हे गाव अंधारातच आहे. गावातील नागरिकांना तब्बल तीन महिन्यापासून विविध समस्यानां सामोरे जावे लागते आहे.गावात वीज नसल्याने ऐन उन्हाळ्यात महिलांची पाण्यासाठी पुन्हा एकदा वणवण सुरु झाली असून, खासगी विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. सुविधा उपलब्ध असतानांही दैनंदिन कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. ऐन उन्हाळ्यात बत्ती गूल झाल्याने गावातील प्रशासकीय कामेही तीन महिन्यापासून ठप्प आहेत. शिवाय गावातील व्यावसायिक बांधवानांही याचा तीव्र फटका बसला आहे.याबाबत वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली असता गावात अधिकृत विजेची मागणी व खेचली जाणारी वीज यात तफावत आहे. यामुळेच डी.पी.अतिरिक्त भार सहन करत नाही, असे उत्तर देत वीज गळती वा चोरी होत असेल तर ती नागरिकांनी रोखावी असे हास्यास्पद उत्तर महावितरणचे अधिकारी देतात. दरम्यान तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शरद उत्तेकर, माजी सरपंच अशोक शिद, विश्राम पोरजे, संतोष भरीत, कैलास शिंदे, संदिप साकुरे, सोमनाथ भवारी यांनी केली आहे.
शेवगेडांग हे गाव तब्बल तीन महिन्यापासून अंधारात असून, याबाबत वीज वितरण, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. तातडीने हा प्रश्न सुटला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
-शरद उत्तेकर
ग्रामस्थ, शेवगेडांग