साप्ताहिक राशिभविष्य

दि. 23 ते 29 ऑगस्ट 2026

मेष : आर्थिक लाभ होतील

नवीन संक्रमणाची नांदी करणारे ग्रहमान आहे. त्यामुळे भविष्यात प्रगती होईल. व्यवसायात वाढत्या व्यापामुळे कार्यपद्धतीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कामामुळे भोवतालचे वर्तुळही बदलण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत किचकट कामातून सुटका झाल्यामुळे निःश्वास टाकाल.

वृषभ : प्रतिष्ठा मिळेल

व्यावसायिक समाधान देणारा सप्ताह आहे. व्यवसायात विविध मार्गांनी पैशाची आवक होईल. कामात बदल करून सुधारणा कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मिळेल. नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे हाती मिळतील. कामात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळेल. पैशाअभावी रेंगाळलेली घरातील कामे पूर्ण होतील.

मिथुन : आनंदाची बातमी मिळेल

सध्या तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अनुभव येतील. व्यवसायात तुमच्या कामाचा उत्साह प्रचंड असेल. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. नवीन ओळखी होतील. पगारवाढीची शक्यता आहे. घरात चांगली बातमी कळेल. समारंभाच्या निमित्ताने नातेवाइकांचा सहवास लाभेल.

कर्क : अकारण धाडस टाळा

स्वतःवर विश्वास ठेवून काम करण्याची वृत्ती असल्याने तुम्हीही तीच अपेक्षा सभोवतालच्या व्यक्तींकडून कराल; परंतु त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहा. व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे बारीक लक्ष ठेवा. काही कारणाने जुने हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा फाजील आत्मविश्वास
दुणावेल.

सिंह : नोकरवर्गाला चांगले दिवस
व्यवसायात नवीन कार्यपद्धतीचा अवलंब कराल. नवीन योजना हाती घ्याल. मात्र त्याची वाच्यता लगेच करू नका. नोकरीत बदली किंवा बदल हवा असल्यास प्रयत्न करा. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. जोडधंद्यातून विशेष लाभाची शक्यता. घरात डोके शांत ठेवा. उगीचच नातेसंबंधांत गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या.

कन्या : योजना सफल होतील

प्रगतिपथावर राहण्यासाठी इतरांच्या कलाने काम करून घेण्याची खुबी आत्मसात केलीत, तर कामांना विलंब होणार नाही. व्यवसायात कोणालाही न दुखावता हेतू साध्य करा. स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. मनाप्रमाणे काम करण्याची मुभा मिळेल. तरुणांनी भावनोद्रेक टाळावा.

तूळ : शासकीय कामे रेंगाळतील

सध्या बरेच काम करण्याची इच्छा असेल; परंतु सभोवतालच्या बदलामुळे थोडे साशंक व्हाल. व्यवसायात हवे तसे सहकार्य न मिळाल्याने काही कामे पुढे-मागे होतील. माणसांची खरी पारख होईल. व्यवसायात गिर्‍हाइकांशी बोलताना जरा जपून. खरे हितचिंतक कोण हे ओळखण्याची संधी मिळेल.

वृश्चिक : नोकरदारांनी काळजी घ्या

सध्या परस्परविरोधी ग्रहमान आहे. व्यवसायात पैशाची आवक समाधानकारक राहील. मात्र, हाती असलेल्या पैशाची गुंतवणूक करताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पैशाचा विनियोग योग्य मार्गाने होईल, याची दक्षता घ्यावी. नोकरीत कामात वरिष्ठांच्या सूचनांमुळे निर्बंध येतील. हातून चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या.

धनु : उत्साह वाढेल

प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. तुमच्या मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा जागृत होतील. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहिल्याने नवे प्रयोग करावेसे वाटतील. कामामुळे नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. नोकरीत वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. जोडधंद्यातून वरकमाई होईल.

मकर : पदोन्नती मिळेल

प्रकृतीची वाटचाल सुकर करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात तुमच्या आचारविचार व जीवनपद्धतीत बदल करण्याची ही नांदी असेल. व्यवसायात, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन पद्धत व नवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे होईल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल.

कुंभ : आनंदी राहाल

सभोवतालच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतल्याने तुम्ही ताजेतवाने व्हाल. व्यवसायात नवीन कामासंबंधीचे नियोजन सफल होईल. तुमचे बेत गुप्त राखा. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा. नोकरीत आळसाने लांबवलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामाचा उबग आल्याने विश्रांती घ्यावीशी वाटेल.

मीन : योजना सफल होतील

लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल, तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात बरेच मोठे बेत मनात असतील, पण ताळेबंद केल्यावर ते आपल्या आवाक्यात नाहीत असा प्रत्यय येईल. नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कामामुळे जादा अधिकार व सवलती मिळतील.

Weekly Horoscope

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *