स्वागत समिती- पोलीस आयुक्तांत परवानगीवरून रंगला कलगीतुरा

नाशिक : प्रतिनिधी
मराठी नववर्षानिमित्त काढण्यात येणार्‍या शोभायात्रेच्या परवानगीवरुन स्वागत समितीचे पदाधिकारी आणि पोलीस आयुक्त दीपककुमार पांडेय यांच्यात सद्या कलगीतुरा रंगला आहे. आयुक्तांनी स्वागत समितीवर केलेल्या आरोपांनंतर स्वागत समितीचे पदाधिकार्‍यांनीही थेट आयुक्तांनाच आव्हान दिले असून, आम्ही परवानगी घेण्यासाठी आलो होतो. वाटल्यास आयुक्तालयातील सीसीटिव्ही फुटेज चेक करा. असे म्हणत परवानगी द्यायचीच नाही, विनाकारण तिष्ठत ठेवायचे. असाच आयुक्तांचा पवित्रा दिसतो. असा आरोप स्वागत समितीच्या पदाधिकार्‍यांनी केल्यामुळे वादाच्या या गुढीचे काय होणार?याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात येते. मात्र, पोलीस आयुक्तालयाची परवानगी असल्याशिवाय अशा प्रकारची स्वागत यात्रा काढण्यात येणार नाही. अशी भूमिका पोलीस आयुक्त दीपक  पांडे यांनी घेतल्यानंतर स्वागत समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्वागतयात्राच रद्द करुन आयुक्तांवर आरोप केले होते. या आरोपांना आयुक्त दीपक पांडेय यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिल्यानंतर स्वागत समितीच्या पदाधिकार्‍यांनीही आम्ही परवानगीसाठी आयुक्तालयात दोन ते तीन तास बसून होतो. मात्र, तेथील पोलीस अधिकार्‍यांनी आम्हाला आयुक्तांची भेट घेऊ दिली नाही. खा. हेमंत गोडसे यांचे स्वीय सहायक मंडलीक हे देखील आमच्यासोबत पोलीस आयुक्तालयात परवानगी घेण्यासाठी सोबत होते. मात्र, आयुक्तांनी दोन तास बसवून ठेवूनही भेट दिली नाही. आणि आता आयुक्त परवानगी घेण्यासाठी कोणी आलेच नाही, असा दावा करीत आहेत. आयपीएस दर्जाचे अधिकारी असे खोटे बोलत आहेत, असा आरोप प्रफुल्ल संचेती आणि स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी यांनी केला आहे. परवानगी देण्यास चालढकल करायची आणि पुन्हा आरोप करायचा की परवानगीसाठी अर्जच केला नाही. हे चुकीचे आहे. असा दावाही स्वागत समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.
दरम्यान, शोभा यात्रेच्या परवानगीवरुन आयुक्त आणि समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे अवघ्या दोनतीन दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याला शोभायात्रा निघणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *