स्त्रीचा संघर्ष संपतो तरी कधी?

लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पा असतात कुठे फिरायला जायचं? शॉपिंगला कधी भेटायचं? आज काय प्लॅन? आणि लग्नानंतर त्याच गप्पांची जागा घेते घर, नोकरी, मुलं, शाळा, डबा, गृहपाठ, जबाबदार्‍या आणि नात्यांची गणितं.
स्त्रीचं आयुष्य बदलतं, पण तिच्याकडून अपेक्षा मात्र कमी होत नाहीत.
पैसे कमवायला सुरुवात करण्यापूर्वीचा संघर्ष वेगळा, कमावू लागल्यानंतरचा संघर्ष वेगळा आणि कुटुंब सांभाळताना स्वतःला टिकवण्याचा संघर्ष तर वेगळाच.
नोकरी करणारी स्त्री दिवसभर बाहेरचं काम करते आणि घरी आल्यानंतर तिची दुसरी शिफ्ट सुरू होते. मुलांची शाळा, त्यांचे डबे, अभ्यास, कपडे, घरातील कामं, कुटुंबाची काळजी सगळं काही तिच्या जबाबदारीचं असल्यासारखं मानलं जातं.
आणि या सगळ्यात तिने एखादी गोष्ट विसरली, मुलाकडून एखादी चूक झाली, अभ्यासात कमी गुण मिळाले किंवा मुलाच्या वागण्यात काही समस्या आली, तर पहिला प्रश्न असतो…
‘आई म्हणून तू लक्ष दिलं नाहीस का?’
पण एवढं सगळं करणार्‍या त्या स्त्रीला कधी कोणी विचारतं का, तुला काय हवं आहे?
तू थकली आहेस का?
आज तू स्वतःसाठी काय केलंस?
स्त्रीला आराम मिळतो का?
हा प्रश्न फक्त नोकरी करणार्‍या स्त्रीचा नाही. घर सांभाळणार्‍या स्त्रीचाही आहे. कारण घरात राहणार्‍या स्त्रीचं काम दिसत नाही, म्हणून ते कमी होत नाही
कुटुंबाची साथ असेल, एकमेकांना समजून घेणारे विचार असतील, तर हा प्रवास नक्कीच थोडा सोपा होतो. पण अनेक कुटुंबांमध्ये आजही जुन्या विचारांची ओझी पुढच्या पिढीवर टाकली जातात.
मुलाचा संसार टिकवायचा असेल तर सहन करावं लागतं
घरासाठी थोडं स्वतःला बाजूला ठेवावं लागतं. बाईने जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
असे विचार आजही अनेक मुलींना नकळत शिकवले जातात, पण संसार टिकवण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची का? स्त्रीने करिअर करावं, पैसे कमवावेत, घर सांभाळावं, मुलांना घडवावं, नाती जपावीत आणि स्वतःच्या भावनांनाही नियंत्रणात ठेवावं या सगळ्या अपेक्षा एकाच व्यक्तीकडून ठेवताना आपण तिच्या माणूसपणाचा विचार करतो का?
हा लेख महिलांसाठी सहानुभूती मागण्यासाठी नाही.हा लेख त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आजही पेटून उभी आहे.
जी परिस्थितीशी लढते आहे.
जी पडते, थकते, रडते पण पुन्हा उभी राहते. जी स्वतःची ओळख हरवू न देता स्वतःचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करते आहे.
तिला नेहमी ‘बिचारी’ म्हणून पाहण्याची गरज नाही. तिला गरज आहे ती समजून घेण्याची, साथ देण्याची आणि तिच्या निर्णयांचा आदर करण्याची. कारण स्त्रीला प्रत्येक वेळी कुणाच्या आधाराची गरज नसते. कधीकधी तिला फक्त एवढंच हवं असतं तू जे करते आहेस, ते आम्हाला दिसतंय आणि तुझी किंमत आम्हाला कळतेय. स्त्रीचा संघर्ष कधीच छोटा नसतो. पण तिच्या संघर्षाला फक्त सहनशीलतेची परीक्षा न बनवता, तिच्या स्वप्नांना, तिच्या श्रमांना आणि तिच्या अस्तित्वालाही तितकंच महत्त्व देणं, हीच खरी पुढच्या पिढीची जबाबदारी आहे.

When does a woman’s struggle ever end?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *